पुणे : आंब्याच्या रिकाम्या पेट्यांच्या आड गोव्यातील मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. आंब्याच्या लाकडी पेट्यांमधून दारुची तस्करी केली जात होती. या कारवाईत तब्बल 12 लाख रुपयांच्या विदेशी मद्यासह एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाने ही धडक कारवाई केली आहे.
आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 चा 80, 81, 83, 90 व 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. नामदेव खैरे, संदीप सानप, गोरख पालवे, महेश औताडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारामतीच्या मोरगाव सुपे रस्त्यावर मूर्टी गावच्या हद्दीत उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. बारामती तालुक्यातील मूर्टी गावच्या हद्दीत हॉटेल सानिकानजीक एक संशयीत बोलेरो पिक अप वाहन आणि हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी थांबवली. तसेच, वाहन चालकाकडे वाहनांमध्ये काय आहे, अशी विचारणा करत चौकशी केली असता दोन्ही वाहन चालकांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने अधिक विचारपूस करण्यात आली.
ही दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन तपासणी केली असता आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्यांच्या आड गोवा राज्यात तयार केलेली व विक्री परवानगी असलेली विदेशी दारू आढळून आली. त्यामध्ये तब्बल 12 लाख 61 हजार रुपयांची दारू, दोन चारचाकी वाहने आणि दोन मोबाईल हँडसेट असा 30 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने जप्त केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात नेमकी कुठे ही दारू नेण्यात येत होती, या अगोदरही अशा पद्धतीने दारुची अवैध विक्री झाली आहे का ? या प्रकरणाचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.