पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांना पुन्हा सह्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. ७ ऑगस्ट रोजी बहुमताने सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव मंजूर करण्यात होता. त्यानंतर विद्यमान सभापती काळभोर यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते.
मात्र, त्यावर सुनावणी पूर्ण होऊन देखील निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्यामुळे काळभोर यांनी कलम ४३ अन्वये पणन मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते. यावर राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी निर्णय घेत अंतरिम स्थगिती दिली आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सभापती दिलीप काळभोर हे समितीच्या कामकाजात सर्व संचालकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत त्यांच्या सह्यांचा अधिकार काढून तो अन्य संचालकाकडे देण्यासाठी बैठकीची मागणी दहा संचालकांनी केली होती. त्यानंतर हे प्रकरण पणन संचालक आणि उच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर यावर अखेर ७ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव बहुमताने संमत झाला होता. या बैठकीत सह्यांचे अधिकार संचालक प्रशांत काळभोर देण्यात आले होते.
सह्यांचे अधिकार काढण्याची तरतुद कायद्यात नसल्याचा दावा करत सभापती दिलीप काळभोर यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. परंतु, त्यावर सुनावणी पूर्ण होऊन देखील निकाल राखीव ठेवला होता. त्यामुळे काळभोर यांनी कलम ४३ अन्वये राज्याच्या पणन मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते.