पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळतो असे आमिष दाखवून महिलेची तब्बल ३० लाख ६१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. हा प्रकार १७ जानेवारी ते १६ एप्रिल या कालावधीत घडला.
याबाबत मुंढवा परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मंगळवारी (ता. १६) मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळतो, असे सांगून विश्वास संपादन केला.
तसेच फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून गुंतवलेल्या पैशांवर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. काही स्क्रिनशॉट पाठवून महिलेचा विश्वास संपादन केला. महिलेने विश्वास ठेवून जानेवारी ते एप्रिल या तीन महिन्याच्या कालावधीत तब्बल ३० लाख ६१ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणूक करूनही त्या रकमेचा कोणताही परतावा मिळाला नाही. याबद्दल विचारणा केली असता आरोपींनी त्यांना ग्रुपमधून काढून टाकले.
दरम्यान, आपले पैसे देण्यास आरोपी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निकम करत आहेत.