पुणे : पुण्यात भटक्या कुत्र्यांनी २ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या लोहगाव परिसरामध्ये ही घटना घडली. कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगावमध्ये २० महिन्यांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. कुत्र्यांनी या चिमुकलीच्या हात, पाय, पाठ आणि चेहऱ्याला जबर चावा घेतला आहे. आरोही पंकज यादव असे या चिमुकल्या मुलीचे नाव आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीवर हडपसर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आरोही यादव घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होती. नंतर ती आरोही रस्त्याच्या कडेवरून चालत आहे. कुत्र्यांना पाहून ती थांबते. दोन कुत्रे तिच्यावर भुंकतात. त्यानंतर तिथे आणखी काही कुत्रे धावत येतात. तिने त्यांना हकलवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यामधील एक कुत्रा आरोहीवर धावून गेला. त्याने तिच्या पायाला चावा घेतला आणि आरोही खाली पडते. त्यानंतर इतर कुत्रे देखील तिच्यावर हल्ला करताना दिसून येतात.
आरोहीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याचा बघून तिची आई तिच्या दिशेने धावून येताना दिसते. ती हाताने कुत्र्यांना हकलवते आणि रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या आरोहीला उचलून घेते. त्या ठिकाणी आणखी एक व्यक्ती पळत येते. दोघेही जखमी झालेल्या आरोहीला घेऊन रुग्णालयात जातात. आरोहीला कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे तिच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.