बापू मुळीक / सासवड : सासवड ( ता. पुरंदर) येथील ऑटोमोबाईल्स गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि. १०) पाहते चार वाजण्याच्या सुमारास सासवड येथील कुंभार वळण रोडवर घडली आहे. शॉर्टसर्किटने आग लागून,
आग लागली त्यावेळी रात्रपाळीस असणारा महेश विवेकानंद कांबळे हा रात्री काम झाल्यावर गॅरेजमधेच केबिनवर झोपला होता. यावेळी हाताला खालून चटके बसण्यास सुरुवात झाल्यावर त्यांना समजले. त्यांनी तातडीने मालक उमेश लक्ष्मण कामठे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. तो पर्यंत गॅरेज मधील गाड्यांना आग लागून मोठं भडका उडाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र गॅरेज मधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच दोन दुचाकी आणि चार चारचाकी गाड्या जळून तब्बल 17 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत बोलताना उमेश कामठे यांनी सांगितले की, माझा कोणावरही संशय नाही व कोणावरही माझी तक्रार नाही.
याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुहास लाटणे हे तपास करीत आहेत.