पुणे : कोथरूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नी माहेरी निघून आल्याने जावयाने सासूरवाडीतील घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील सुतारदरा ही घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांकडून साहिल हनुमंत हाळंदे (वय २५, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हाळंदेच्या सासूने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि त्याची पत्नी तेजल यांच्यात वाद झाल्याने ती बुधवारी रात्री कोथरूड भागातील माहेरी निघून आली होती. त्यानंतर तिच्या पाठाेपाठ साहिल सुतारदरा परिसरातील सासूरवाडीत आला. ‘ तू लगेच घरी आली नाही, तर तुझ्या आईचे घर जाळून टाकील’, अशी धमकी त्याने पत्नीला दिली. त्यानंतर साहिल सासूच्या घरात शिरून शिवीगाळ करायला सुरवात करून त्याने ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. आगीत घरातील साहित्य जळाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या हाळंदेचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करत आहेत.