पुणे : पुण्याच्या ३५ वर्षीय बॅंकरने अटल सेतूवरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातून मंबईला गेलेल्या या बॅंकरने परत येत असताना आपलं आयुष्य संपवलं आहे. कामाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. ॲलेक्स रेगी (वय.३५,रा.पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या बॅंकरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील ॲलेक्स रेगी हा कोटक महिंद्रा बँकेत नोकरीला होता. कंपनीच्या मिटींसाठी तो मुंबईला गेला होता. बीकेसीला बँकेच्या बैठकीला त्याने हजेरी लावली होती. त्यानंतर त्याने मुंबईत राहणाऱ्या सासऱ्याची भेट सुद्धा घेतली होती. तेथून पुण्याला परत येत असताना त्याने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत रेगी याचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीमध्ये कार थांबल्याचे पाहून यंत्रणेने पोलिसांना याची सूचना दिली होती. परंतू, पोलीस पोहोचेपर्यंत ॲलेक्स रेगीने समुद्रात उडी मारली होती.
आत्महत्येचे कारण समोर..
दरम्यान रेगी याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण समोर आले असून कामाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीद्वारे समोर आले आहे. बचाव पथकाने रेगीचा मृतदेह शोधला त्यानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. वरिष्ठांनी त्याच्यावर कामचा दबाव टाकल्याने त्याने आत्महत्या केली असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून यासंदर्भात कसून चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.