लोणी काळभोर: राज्यात विधानसभेची रणधुमाळीला थोड्याच दिवसांत खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याप्रमाणेच इच्छुक उमेदवारांनी देखील आपल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. त्याप्रमाणे शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांपैकी ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी जनसंपर्कात प्रचंड लक्षणीय आघाडी घेतली असून तीर्थक्षेत्र दर्शनाचा त्यांचा फॉर्म्युला या निवडणुकीत “गेमचेंजर” ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा अनपेक्षित निकाल लागेल, अशी चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.
सध्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातही इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. उमेदवारी निश्चित नसल्याने इच्छुकांनी अधिकृतपणे प्रचार सुरु केला नसला, तरी त्यांची प्रत्येक पावले त्यादृष्टीनेच पडत आहेत. इच्छुकांच्या प्रत्येक कृतीतून निवडणूक जवळ आल्याची जाणीव मतदारांना होत आहे.
शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अशोक पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष), पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आजच्या घडीला दिसत आहेत. एखाद्या तात्कालिक कारणामुळे यातील एखाद्या इच्छुकाचा पक्ष व चिन्ह बदलू शकते.
विद्यमान आमदार अशोक पवार हे सलग चौथी निवडणुक लढवत आहेत. त्यांचा मोठा गट शिरूर तालुक्यात आहे. ते व त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांचे नावही भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे.
यावेळी शिरूर हवेलीच्या मैदानात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांनीही शड्डू ठोकला आहे. त्यांनी हजारो नागरिकांना उज्जैन दर्शन घडवून आणले आहे. अजूनही बऱ्याच नागरिकांना उज्जैनसह इतर तीर्थक्षेत्रांंचे दर्शन घडवून आणण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उज्जैनसह वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांंचे दर्शन मतदारांना घडविल्यामुळे त्यांनी निवडणुकीपूर्वीच मोठी आघाडी घेतली आहे, अशी जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली आहे. नागरिकांना उज्जैन दर्शन घडविल्यामुळे या निवडणुकीत ज्ञानेश्वर कटके इतर उमेदवारांंच्या तुलनेत एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येत आहे.
महायुती व महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या जागेवर कोण उमेदवार असणार, याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. तरीही शिरूर हवेली मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता असून यामध्ये ज्ञानेश्वर कटके यांच्या तीर्थक्षेत्र दर्शन मोहिमेमुळे ते आघाडीवर आहेत.
उज्जैन दर्शन निर्णायक ठरणार ?
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात ज्ञानेश्वर कटके यांनी हजारो नागरीकांना तीर्थयात्रा घडवून आणली आहे. या तीर्थयात्रेदरम्यान त्यांनी प्रत्यक्षात लोकांशी संवाद साधून जवळीक निर्माण केली आहे. तीर्थयात्रेत ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून नागरिकांना चांगली सेवा मिळाल्याने नागरिक त्यांच्यावर खुश आहेत. त्यांची नागरिकांमध्ये लोकप्रियता वाढल्याने मतदानाचा कौल त्यांच्या बाजूने वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उज्जैन दर्शन हे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात निर्णायक ठरणार, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर कटके यांचे पारडे जड असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.