जुन्नर(पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी १९ फेब्रुवारीला ३९४ वा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे. प्रशासनाच्या वतीने या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, मुख्यमंत्री शिंदे सकाळी आठ वाजता जन्मोत्सवासाठी किल्ल्यावर उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि अन्य मंत्री या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
आकर्षक विद्युतरोषणाई
शिवजयंती उत्सवानिमित्त शिवजन्मस्थान, शिवकुंज, शिवाईदेवी मंदिरास आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. गडावरील दरवाजांना फुलांची तोरणे लावण्यात आली आहेत. सकाळी शिवाईदेवीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
‘शिवाई देवराई’ या वनोद्यानाचे लोकार्पण
शिवनेरीवरील वन विभागाच्या ‘शिवाई देवराई’ या वनोद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शिवभक्तांची वाढती गर्दी पाहता गडाच्या पायथ्याशी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी या वर्षी वाहनतळ वाढविण्यात आले आहे. उत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. उत्सवासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.