शिरूर, ता.२५: शिरूरची सुकन्या डॉ.मानसी नानाभाऊ साकोरे यांनी तीन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. नुकत्याच लागलेल्या ‘यूपीएससी’च्या निकालामध्ये देशात ४५४ व्या रँकने उत्तीर्ण होऊन डॉ.मानसी ह्या ‘आयपीएस’ झाल्या आहेत.
‘आयएएस’ होण्याचे स्वप्न हेच अंतिम लक्ष ठेवल्यामुळे डॉ.मानसी यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. तीन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या डॉ.मानसी या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये बहुधा पहिल्याच महिला अधिकारी आहेत.
देशपातळीवर ४५४ वी रँक प्राप्त झाल्यामुळे डॉ.मानसी नानासाहेब साकोरे या भारतीय पोलीस सेवेत (IPS) रुजू होणार आहेत.
शिरूर शहरामधील छत्रपती कॉलनी येथे सेवानिवृत्त सैन्य अभियांत्रिकी अधिकारी नानाभाऊ साकोरे हे पत्नी रंजना,दोन मुली डॉ.दीपिका आणि डॉ.मानसी व मुलगा डॉ.जय असे वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे नानाभाऊ साकोरे यांच्या दोन्ही मुली व मुलगा हे तिघेही डॉक्टर आहेत. मोठी मुलगी डॉ.दिपिका या विवाहित असून, नागपूर येथे आरोग्य खात्यात डायरेक्टर आहेत. तर त्यांचे पती कृष्णात पाटील (IRS) हे रेल्वेत वरिष्ठ आधिकारी आहेत, त्याचप्रमाणे नानाभाऊ साकोरे यांचा मुलगा डॉ.जय हे एम.एस.ऑर्थोपेडिक आहेत, डॉ.मानसी यांनी बीडीएसचे शिक्षण पूर्ण करून त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होत्या.
डॉ.मानसी ह्या यापूर्वीच आयपीएस झाल्या होत्या.परंतू,आयएएस होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या डॉ.मानसी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास पुढे सुरूच ठेवला होता. यूपीएससीमध्ये तिहेरी यश मिळवलेल्या डॉ.मानसी यांना गतवर्षीच्या यूपीएससी परीक्षेच्या निकालामध्ये ५३१ वी रँक प्राप्त झाली होती. मात्र,नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये डॉ.मानसी यांना देशात ४५४ वी रँक मिळाली आहे. डॉ.मानसी यांनी पुन्हा तिसऱ्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस (IPS) होण्याचा बहुमान मिळवला आहे. डॉ.मानसी या तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्व.अर्जुनराव शेटे यांची नात आहेत.
डॉ.मानसी साकोरे यांचे प्राथमिक शिक्षण शिरूर नगरपरिषदेच्या मराठी शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी शिरूर येथीलच विद्याधाम प्रशालेतून पूर्ण केल्यानंतर डॉ.मानसी यांनी बीडीएसला म्हणजे दंत वैद्यक शास्त्रामध्ये प्रवेश घेऊन पदवी प्राप्त केली. परंतू, लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या डॉ.मानसी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतही यश मिळविले होते. त्यामुळे डॉ.मानसी यांनी सुरवातीला तीन महिने यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावला त्यानंतर संपूर्ण परीक्षा आणि अभ्यासाची तयारी डॉ.मानसी यांनी घरीच केली व उत्तुंग यश प्राप्त केले.
‘पुणे प्राईम न्यूज’शी डॉ.मानसी यांचे वडील नानाभाऊ साकोरे यांनी बोलताना सांगितले की, मला डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती परंतू, माझ्या घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे मला डॉक्टर बनता आले नाही. मात्र,माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न माझ्या तीनही मुलांनी डॉक्टर होवून साकार केले. माझ्या तीनही मुलांचे भविष्य व करियर घडविण्यात पत्नी रंजना यांचे खूप मोलाचे योगदान आहे. कारण मी सैन्य दलातील नोकरीमुळे कायमच घरापासून दूर होतो.अशा वेळी मुलांना घडविण्याचे व त्यांना चांगले संस्कार देण्याचे काम पत्नी रंजना यांनी केल्याचे नानाभाऊ साकोरे यांनी आवर्जून नम्रतापूर्वक सांगितले.
माझ्या यशात आई रंजना व वडील नानाभाऊ ह्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे डॉ.मानसी यांनी सांगितले. ग्रामीण भागात व मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेतलेली मुलेही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवू शकतात.मोठे स्वप्न पाहण्याची इच्छा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास,जिद्द,चिकाटी व कष्ट घेण्याची तयारी असेल तर कोणालाही यश मिळू शकते.असे डॉ.मानसी यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांनी पुढील आयुष्यासाठी ‘ए’आणि ‘बी’ असे दोन प्लॅन तयार करून स्पर्धा परीक्षकांची तयारी करावी. कारण कोणत्याही यशाला कधीही शॉर्टकट नसतो. त्यामुळे अभ्यास आणि सातत्य हेच स्पर्धा परीक्षेच्या यशाचे रहस्य आहे. असेही डॉ.मानसी यांनी शेवटी सांगितले.