अमोल दरेकर
Pune Crime सणसवाडी : शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव गावातील फलकेमळा येथे ऋत्विक मनोहर गिरीधर (रा. शिरूर, जि. पुणे) यांच्याकडील चार बॅटरी आणि ५० हजार रुपये रक्कम दोन अनोळखी व्यक्तींनी मारहाण करून चोरल्याची फिर्याद देण्यात आली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींनी पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडील चोरीचा माल व गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार (क्र. एसएच १२ जेयू ६५९७ जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी दीपक गणेश गुगळे (वय २३ वर्षे, रा. वडुळे खुर्द, शेवगाव, जि. नगर), शहेबाज जुबेर शेख (वय ३४ वर्षे, रा. बाजार भिंगार, जि. नगर) यांना या गुन्ह्यात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस निरीक्षक महेश धवन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पो.पो. कॉ. विजय शिंदे, उमेश कुतवाल यांना निर्देश दिल्यानंतर तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.
अटक आरोपी दीपक गुगळे याने शहराच्या हद्दीत अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्या गुन्ह्यांबाबत तपास केला असता असे आढळून आले की, आरोपी दीपक गुगळे हा ‘जस्ट डायल’ वर कॉल करून विविध भागातील प्रसिद्ध बँका, कपडे, शिलाई मशिन, ब्रेड विक्रेते, तेल विक्रेते यांचे नंबर मिळवून संबंधित दुकानदारांना फोन करायचा. फोनवर तो चुकीची माहिती देऊन फसवणूक करत असे. ”मी अहमदनगर येथील रहिवाशी आहे. येथील धर्मादाय संस्था मारवाडी आहे. मला कपडे, बॅटरी, शिलाई मशीन, अनाथाश्रम, वृद्धाश्रमात दानासाठी तेलाचे डबे हवे आहेत,” असे सांगत मालाची ऑर्डर एका पत्त्यावर पाठवण्यास सांगत असे. दुकानदारही मोठी पार्टी मिळाल्याच्या आनंदात कशाचाही विचार न करता घंटागाडीत माल भरून ऑर्डरनुसार पाठवत असत. त्यानंतर आरोपी गुगळे याने दुकानदाराकडून चालकाचा नंबर घेतला आणि त्याने दिलेल्या पत्त्यावर ८० टक्के माल टाकला आणि २० टक्के माल दुसऱ्या पत्त्यावर नेतो आणि तेथे आल्यावर सर्व पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर आरोपी गुगळे हा जप्त केलेल्या ८० टक्के वस्तू घेऊन गायब झाला आणि फोन ठेवून दिला. त्यानंतर उरलेला २० टक्के माल न घेताच चालक दुकानात परतला तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. अशा प्रकारे आरोपी गुगले याने त्याचा साथीदार आरोपींसह गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
संबंधित कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश धवन, सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवाल, विजय शिंदे, विलास आंबेकर, तेजस रासकर, माणिक काळकुटे, संतोष औटी आणि वैजनाथ नागरगोजे यांनी केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत.