अमिन मुलाणी
सविंदणे : शिरूर तालुक्यातील सविंदणे व कवठे येमाई येथील अवैध दारू धंद्यावर शिरूर पोलिसांच्या पथकाने धाड मारून चौघांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून दारू व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. ‘पुणे प्राईम न्यूज’ने यापूर्वी यासंदर्भात वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप शहाजी चौगुले (रा. माळवाडी ता. शिरूर), बबुभाई पडवळ (रा. सविंदणे ता. शिरूर) हे सविंदणे येथे तर कवठे येमाई येथे निलेश काळूराम बोडरे, शारदा प्रकाश भंडारी दोघेही (रा. कवठे येमाई ता. शिरूर) अवैध हातभट्टीची दारू विक्री करताना आढळून आले. पोलिस जवान दीपक पवार यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी चारही जणांवर गुन्हा दाखल केला.
दरम्यान, नागरिकांना अवैध दारू धंदे सुरू असल्याने निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिस ठाण्याला कळवावे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन शिरूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी केले आहे.