Shirur News : शिरूर : पुणे जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली असून, याचा सर्वाधिक फटका या भागातील शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. शेती पूरक व्यवसाय वृद्धींगत करत असताना बिबट्यांमुळे पाळीव प्राणी धोक्यात आले आहेत. अनेकवेळा शासनदरबारी याबाबत निवेदन देऊन देखील बिबट्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही.
मजूर भितीच्या सावटाखाली, मेंढपाळांना भटकंतीमध्ये अडचणी, नागरिकांना प्रवासाची, शेतात जाण्याची समस्या… या समस्यांकडे सर्रास डोळेझाक करून, बिबट्यांबाबत फक्त राजकारण केले जात आहे. वनविभाग जीव गेल्यावर पंचनामा करून नुकसान भरपाई देईलही. पण ज्याचा जीव जाणार आहे, त्याचं काय? किती जणांचे बळी गेल्यावर सरकार या समस्येकडे गांभीर्याने पाहणार, असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
किती बळी गेल्यावर सरकार या समस्येकडे पाहणार
बिबट्यांची वाढती संख्या
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी व्यवस्थापनेमुळे शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन झाले आहे. यामधून जवळपास ८५ टक्के शेतजमीन ही ओलीताखाली आली आहे. त्यातून नगदी पिकाकडे शेतकरी वळल्याचे दिसून येत आहे. ऊसासारख्या पिकामधून १३ ते १४ महिने वास्तव्य करण्यासाठी आडोशाची जागा उपलब्ध झाली आहे. यामध्ये अन्न व पाण्याची उपलब्धता होऊ लागल्याने बिबट येथे वास्तव्य करून राहू लागले आहेत.(Shirur News)
नैसर्गिक ठिकाणात बिबट्या राहण्यास पसंत करत असला तरी देखील ऊस व फळांच्या बागा यामध्ये आपोआपच नैसर्गिक ठिकाणे तयार झाल्याने बिबट येथे पहावयास मिळतात. सध्या शिरूर तालुक्याच्या बेट भागातील नद्यांच्या किनारी अशी नैसर्गिक ठिकाणे तयार झाल्याने या भागात बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन झाल्याचे पहावयास मिळते. त्याबरोबरच चासकमान डावा व उजवा कालवा, डिंभा डावा व उजवा कालव्याच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. असे बिबट प्रवण क्षेत्र वाढल्याने सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना बिबट समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकतेच पिंपरखेड-जांबूत रस्त्यावर ४ बिबटे एकत्रित फिरत असल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यातून बिबट्यांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे.
शेतीपूरक व्यवसाय धोक्यात
अतीवृष्टी, दुष्काळ, शेतमालाला कमी बाजारभाव यामुळे अनेक शेतकरी हे शेती पूरक व्यवसायाकडे वळले आहेत. त्यातून पशुपालन व्यवसाय उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये शेळीपालन, मेंढ्यापालन, कुकुटपालन, गोपालन यासारख्या व्यवसायाची निर्मिती झाली. भटकंती व शेड करून हा व्यवसाय करण्याचा प्रयत्न या भागातील शेतकरी, नागरिक करू लागले आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करून चारा आणि पाणी मिळवून या पाळीव प्राण्यांचा उत्तम व्यवसाय केला जातो. (Shirur News) निसर्गाच्या सानिध्यात भटकंती केल्यामुळे या प्राण्यांची वाढ देखील चांगली होते. भटकंती करत असताना मोठ्या प्रमाणात या पाळीव प्राण्यांवर हल्ला होताना पहावयास मिळतो. हल्ल्यानंतर वनविभागाकडून पंचनामा होऊन नुकसानभरपाई मिळते. ती कमी प्रमाणात असते म्हणूनच या भटकंती करणाऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. शेडमध्ये पाळीव प्राण्यांवर हल्ला होतो. त्यातून देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते.
भितीच्या सावटाखाली मजूर
नैसर्गिक पावसावर व उपलब्ध पाण्यावर शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या पुणे जिल्ह्यातील धरणांवर पाण्याचे व्यवस्थापन करून शेतात वेगवेगळी पीके घेण्याकडे शेतकरी वळाला आहे. यामध्ये कामगार व मजुरांकडून वेगवेगळ्या पद्धतीने कामे करून घेतली जात आहेत. यासाठी माळशेज, मुरबाड, सरळगाव या भागातील अधिवासी, ठाकर समाजातील कामगार आळेफाटा या परिसरात मोठ्या प्रमाणात येतात. शेतीतील कामे करण्यासाठी शेतकरी या कामगारांना व मजूरांना बोलवतात.
ऊस, फळबागा याबरोबर कांदा लागवड, पिके काढणीची कामे करून घेतली जातात. पण दिवसादेखील बिबट्याचे दर्शन होत असल्याने हा कामगार वर्ग भितीच्या वातावरणात आहे. शेतात बसून कामे करावी लागत असल्याने बिबट्या दबक्या पावलाने हल्ला करण्याची भिती असते. त्यामुळे शेतमजूर शेतात काम करण्यास धजावत नाही. यासाठी मजूरांना संरक्षण मिळणे अपेक्षित आहे. याकडे शासन दरबारी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दिवसा वीज नसल्याने रात्रीचे पिकांना पाणी द्यावे लागते. पण दिवसा वीज मिळण्यासाठी शासन दरबारी कोणतीच यंत्रणा हालचाल करत नसल्याचे पहावयास मिळत आहे. वनविभाग जीव गेल्यावर पंचनामा करून नुकसान भरपाई देईलही. पण ज्याचा जीव जाणार आहे, त्याचं काय? हा एक न सुटणारा प्रश्न आहे.
प्रवासातला धोका
दबक्या पावलाने बिबट्या हल्ला करतो. यामुळे दुचाकी वाहनावर प्रवास करणाऱ्यांना धोका वाढला आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर या परिसरात मागील काळात दुचाकीस्वारांवर बिबट्याचे हल्ले चढवले आहेत. यामध्ये नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जांबूत येथे प्रवास करताना एका महिलेचा जीव गेल्याची घटना घडल्याने बिबटमुळे प्रवासातला धोका वाढल्याचे अधोरखित होत आहे. शाळेतील मुले देखील सायकलवरून प्रवास करतात. (Shirur News) त्यांना देखील बिबट्यांकडून धोका संभावतो. यासाठी खरेतर बिबट प्रवण क्षेत्रात वारंवार मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. प्रवाशांनी वनविभागाने दिलेल्या सूचना फलकांचे वाचन करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच शाळेतील मुलांच्या सकाळ-संध्याकाळच्या प्रवासाच्या काळात संबंधित वन कर्मचाराऱ्यांची गस्त वाढवणे आवश्यक आहे.
माणिकडोह निवारा केंद्रातील बिबट्यांचे काय झाले?
जुन्नरजवळील माणिकडोह धरणाजवळ बिबट्यांसाठी निवारा केंद्र सुरू केलेले आहे. हे केंद्र सुरू झाल्यापासून ३०० पेक्षा जास्त बिबटे येथे पकडून आणले, पण पुढे या बिबट्यांचे काय झाले, किती बिबट्यांना आयडी कॉलर लावले, किती बिबट्यांना कुठे कुठे सोडून दिले, याबाबतची माहिती उपलब्ध नाही. बिबट्यांना शिकारीसाठी हरीण, भेकरे, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची पुरेशा प्रमाणात आवश्यकता असते. पण यासारख्या वन्यप्राण्यांची संख्या प्रमाणापेक्षा खूपच घटली आहे.
अखेर बिबट हा निर्सगात राहणारा प्राणी असला तरी देखील अन्न व पाण्याच्या शोधात व मानव वस्तीतील आडोसा यामुळे बिबट मानवाच्या जवळ आला आहे. हे लक्षात घेऊन वनविभागाच्या सल्ल्याने काळजी घेतली गेली पाहिजे. वास्तविक नागरिकांनीसुद्धा बिबट्यांबरोबर कसे राहायचे, याची जीवनशैली शिकली पाहिजे. तर बिबट्यांमुळे नागरीवस्तीचे कसे नुकसान होणार नाही याची खबरदारी वनखात्याने प्रखरपणे घेतली पाहिजे. तरच काही प्रमाणात बिबट्या समस्या दूर होतील. (Shirur News) आपल्या समस्या आपल्यालाच सोडवायच्या असून, यासाठी राजकीय नेते काही करत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : यात्रा-जत्रांमधून दिसणारी लोकनाट्य तमाशा ही शाश्वत अन् जिवंत कला