युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठंमोठे बदल झालेले पाहावयास मिळतात. जसे गाव पातळीवर गटतट करून राजकारण करणाऱ्या गाव पुढाऱ्यांनंतर राज्यातील नेत्यांमध्ये देखील गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे भविष्यात आपले राजकीय वर्चस्व राहण्यासाठी पक्षबांधणी करण्याचे काम जोरात सुरू आहे. तरूणांना एकत्र करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम नेते मंडळींकडून होऊ लागले आहे.
राजकीय वर्चस्व राहण्यासाठी तरुणाईचा वापर
सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता सगळ्या नेत्यांना हवा हवासा असतो. त्यातूनच पक्षात वेगवेगळ्या भूमिका बजावण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्याला पदाचे स्थान निर्माण करून दिले जात आहे. (Shirur News) ‘बिनपगारी अन् फुल अधिकारी’ असणाऱ्या या पदासाठी कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. पण याच तरूणाईला बेरोजगारीची समस्या भेडसावत असताना नेतेमंडळी धावून जात नाहीत. याबद्दल कोणी बोलणार आहे की नाही?
स्पर्धा परीक्षांचे उशीरा लागणारे निकाल यामुळे तरूणाईमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. बेरोजगारीची समस्या भेडसावत असल्याने आयुष्याची झालेली बर्बादी पाहता तरूण संकटात आला आहे. लाखो तरूण आज वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून आपले भवितव्य आजमावित आहेत. (Shirur News) पण यातून बोटावर मोजण्याइतकेच तरूण यशस्वी होत आहे. या बाबींकडे लक्ष देता देशात बेरोजगारीची समस्या भयावह आहे. राज्यामध्ये ७५ हजार बेरोजगार तरूणांसाठी प्रशासनात भरती होणार आहे. त्यासाठी तरूण वर्गामध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहे. मात्र, यामध्ये किती बेरोजगार तरूणांना रोजगार निर्माण होईल. याबाबत शंकाच आहे.
पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बेरोजगारांना रोजगार हा प्रमुख मुद्दा घेऊन बहुतेक नेते मंडळी निवडणुकीला सामोरे जात असतात. झालेल्या पंचवार्षीक कालखंडात किती तरूणांना रोजगार प्राप्त झाला. (Shirur News) याबाबत कुठेही उल्लेख होत नाही. ही बाब मतदारांच्या लक्षात कधी येणार? हा देखील प्रश्नच आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून तरूणांना रोजगार मिळविण्यासाठी रोजगार मेळावे नेते मंडळीनी घेतलेत का? तरूणांना रोजगार निर्मीतीसाठी काय प्रयत्न केले गेले. याबाबत चाणाक्ष मतदार केव्हा जागृत होणार? याकडे लक्ष दिले पाहिजे.
तरूणांच्या हाताला काम मिळाले तर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे. पण रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. कंपन्यांच्या बाहेर दररोज मोठा लोंढा रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. यामध्ये ठेकेदार पद्धतीने रोजगार मिळू लागले तरी कायमस्वरूपी रोजगार मिळेल याची शाश्वती नसते. त्यातून ठेकेदारच मोठा होत असल्याचे चित्र आहे. कुटूंबाला पोसण्यासाठी वयात आलेल्या तरूणाची नोकरी ही तारेवरची कसरत होऊ पाहत आहे. त्यातून राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या कंपन्यामुळे रोजगाराचा मुद्दा अजून मोठा होत चालला आहे. याला कारण कोण? याला मतदारांनी ओळखले पाहिजे.
कमी वेळात श्रीमंत होण्याचे स्वप्न आजचा तरूण पाहू लागला आहे. त्यातून कोणतेही काम हे कमी दर्जाचे नसते. याची जाण तरूणवर्गात राहिली नाही. त्यामुळे कामाचा दर्जा सुधारवण्यासाठी तरूणवर्ग धजावत नाही. त्यातून फक्त पैशासाठी वेळ घालून केलेल्या कामामुळे कंपन्याचा दर्जा ढासळला जातो. त्यातून कामावरून काढून टाकण्याचे प्रकार होतात. त्यामुळे देखील बेरोजगारांची संख्या वाढली आहे. मिळालेले काम प्रामाणिक पणाने केल्यावर आपल्याच भागात आपल्याला रोजगार प्राप्त होणार आहे. (Shirur News) ही बाब तरूणांनी लक्षात घेतली पाहिजे. कामात दर्जा ढासळत असल्याने परराज्यातून मोठ्या प्रमाणात कामगारांचा लोंढा राज्यात रोजगार प्राप्त करू लागला आहे. त्यामुळे राज्यातील रोजगार परराज्यातील युवकांनी काबिज केल्याचे पाहावयास मिळू लागले आहे. याबाबत तरूणांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे.
रोजगार किंवा नोकरी मिळत नसल्याने तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात नेतेमंडळीच्या संपर्कात असतात. त्यातून पक्षात मोठ्या प्रमाणात निष्ठेचे कार्यकर्त्यांचे प्रमाण वाढलेले असते. सध्या तर पक्षात दोन गट निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांची मनाची चलबिचल झालेली पाहावयास मिळते. काल एकाच छताखाली काम करत असताना राजकारणात एकाच पक्षात फूट पडल्याने कोणाच्या बाजूने गेल्यावर आपले भले होणार या मुद्यावरून या तरूणांईमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यातून पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करण्यासाठी नेतेमंडळी सरसावल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, यातून युवक, युवतींमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोशल मीडिया सेल अशी वेगवेगळी पदं बहाल करण्याकडे पक्षप्रमुख सरसावले आहेत. (Shirur News) पण बेरोजगार तरूणाईसाठी रोजगार निर्मिती हा विषय या नेतेमंडळींनी घ्यावा. व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे याबाबत तरूणाईला मार्गदर्शन व्हावे. अशी सुबुद्धी सूचावी हे मात्र खरे आहे. तरूणांनो, सावधान ! पक्षात प्रमुखपद स्वीकारण्यापेक्षा कुटुंब सावरण्यासाठी व्यवसाय, नोकरी, अथवा उद्योगधंद्याकडे वळा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूर येथील सिताबाई थिटे डी फार्मसी महाविद्यालयास उत्तम श्रेणी प्रदान…
Shirur News : सख्ख्या भावाला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी