न्हावरे: वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील (Shirur News) छत्रपती शिवाजी (Pune News) महाराज चौकाजवळ बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद भाऊसाहेब शहाजी टेंगले (पोलीस कॉन्स्टेबल, ब.नं.1722,शिरूर पोलीस स्टेशन) यांनी दिली असून, पोलिसांनी या प्रकरणी दिलेली संविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (ता.14) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान वडगाव रासाई येथील श्रेया मेडिकल समोर भाऊ उर्फ पांडुरंग मोहन गायकवाड (वय 25, रा.वडगाव रासाई ,ता.शिरूर ,जि.पुणे) हा संशयितरित्या थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याची झाडा झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आली.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे लोखंडी बनावटीचे गावठी पिस्तूल (7 इंच बॅरेल,8 मि.मी व्यास) तसेच तीन जिवंत काडतुसे (प्रत्येकी किंमत 1 हजार रुपये) असा एकूण 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच काडतुसांवर ‘KF 7.65’ अशी अक्षरे आणि चिन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
घटनास्थळी पिस्तूल व काडतुसे बेकायदेशीररीत्या बाळगल्याने भाऊ उर्फ पांडुरंग गायकवाड या आरोपीविरुद्ध शिरूर पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रमेश कदम हे करीत असून, शिरूर तालुक्यात बेकायदेशीर शस्त्राचे प्रकरण उघडकीस आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारच्या घटना गांभीर्याने घेऊन विनापरवाना शस्त्रे कोठून येतात याचा शोध घ्यावा.अशी मागणी होत आहे.







