पुणे: नवले पूल परिसरातील (Pune Navale Bridge) सतत वाढत असलेल्या अपघातांच्या (Pune News) पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन नियोजन करणं गरजेचं आहे. कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी वेळ लागणार असल्याने तातडीने अमलात आणावी लागणारी जबाबदारी विविध यंत्रणांवर सोपवण्यात आली असून, यासाठी पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर अपघात रोखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवले पूल परिसरातील धोकादायक ठिकाणांवर कोणत्या तातडीच्या उपाययोजना करता येतील, याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जांभूळवाडी ते वडगाव दरम्यान वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी विविध कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीची बैठक वेळेवर घेणे, सेवा रस्त्यांची प्रलंबित कामे लवकर पूर्ण करणे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वडगाव पुलाचे रुंदीकरण तातडीने सुरू करणे या सूचना देण्यात आल्या.
नवले पूल परिसरातील अपघातांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी जांभूळवाडी ते वारजे रिंग रोड आणि जांभूळवाडी ते रावेत उन्नत मार्ग हे दोन पर्याय महत्त्वाचे मानले जात आहेत. पीएमआरडीएकडून रिंग रोडसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून त्याला अधिक गती देण्याचे निर्देश देण्यात आले. उन्नत मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार असून तो लवकरच मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांना त्यांच्या कामांची स्पष्ट जबाबदारी देण्यात आली. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या कामांचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. स्पीड गन्सची संख्या तीनवरून सहा करण्याचा निर्णय घेतला असून वेगमर्यादा प्रतितास 60 ऐवजी 30 किलोमीटर करण्यावर भर देण्यात आला. रस्त्यावरील रिफ्लेक्टर्स वाढवणे, पीएमपीकडून अधिकृत बसथांबे उभारणे आणि सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवणे या कामांनाही गती देण्यात येणार आहे. तसेच खेड शिवापूर टोलनाक्यावर जड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोरपणे केली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांवर पुढील टोलनाक्यावर कारवाई करण्यात येईल.







