युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : लांब वाढलेले जटा झालेले केस, कपाळाला मळवट, चेहरा व त्वचा रापलेली, कमरेला विविध रंगांच्या कापडांचं बनविलेलं कमरेचं वस्त्र, त्यावर बांधलेली मोठ्या आकाराची घुंगरं, पायात चाळ, हातात आसूड आणि डफावर गायलेली लखाआईची गिते… या तालावर नाचणारा पोतराज पायातल्या घुंगरांनी वातावरण भारून टाकतो. हातातल्या आसुडाने स्वत:वर फटक्यांचा वर्षाव करून मरिआईच्या कडक स्वभावाला साजेसा भक्तीचा आविष्कार दाखवत राहतो. एरवी सुगीच्या दिवसांत आढळणारा हा पोतराज आता शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील आठवडे बाजारात देखील दिसू लागला आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने दान देणारे हात आखडल्याचे चित्र आहे. यामुळे या गुणी लोककलावंतांच्या नशिबी उपेक्षितांचे जिणे पहावयास मिळत आहे.
दान देणारे हात आखडल्याने पोटापुरतेही मिळेना
सुगीचे दिवस सुरू झाले की ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारचे लोककलावंत शेत शिवार, वाडी वस्ती व गावागावांत फिरताना दिसू लागतात. यामध्ये पिंगळा, कडकलक्ष्मी, नंदीबैल, बहुरूपी अशा अनेक प्रकारचे लोककलावंत सुगीच्या दिवसांत आढळून येतात. डफ वाजवून विशिष्ट प्रकारे ध्वनी निर्माण करत, पायातल्या चाळाने तालात ठेका धरला जातो. (Shirur News) या तालावर नाचणारा पोतराज पायातल्या घुंगरांनी वातावरण भारून टाकतो. मरिआईच्या गाड्यासमोर बोललेला नवस फेडण्यासाठी वर्षभर थांबून पोतराज येण्याचीच वाट पाहिली जाते. पोतराज हा देवी आणि भक्त या दोघांमधला दुवा आहे. दार उघड बया, दार उघड… म्हणत तो मरिआईला भक्ताच्या भेटीला घेऊन येतो. महाराष्ट्रात तिचे मंदिर गाववेशीवर असते.
पोतराज या मराठी शब्दाचा मूळ द्रवीड शब्द पोत्तुराजू असा आहे. पोत्तु म्हणजे रेडा किंवा बकरा. दक्षिणेकडे प्राण्यांचा बळी देवीला प्रसन्न करण्यासाठी दिला जात असे. असा बळी देण्याचे काम करणारा म्हणजे पोतराज. (Shirur News) ढोलक्याचा तालबद्ध आवाज, त्यावर वाजणारी घुंगरं आणि आसुडाचे कडाडणारे फटके कानावर पडताच ग्रामीण भागातील सुहासिनी महिला हातात ध्यान्याचे सूप किंवा खण-नारळ घेऊन लगबगीने बाहेर येतात. ग्रामीण भागातील महिलांची या देवीवर गाढ श्रद्धा आहे, असे पोतराज नामदेव केकरे सांगता होता.
एरवी मिळेल त्या धान्यावर गुजराण करणारा हा लोककलावंत आता आठवडे बाजारात पाच-दहा रूपये मागताना दिसत आहे. या कलेवर अफाट प्रेम असूनही महागाईमुळे लोक पैसे द्यायला का-कू करताना दिसतात. आधुनिकतेमुळे पोतराज मात्र, उपेक्षित राहिलेला आहे. आम्हा कलावंतांना ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून थोडीफार किंमत मिळते. (Shirur News) शेतकरीच आमचे दैवत आहे. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आठवडे बाजारात जे काही मिळेल त्यावर आम्हाला गुजराण करावी लागत असल्याचे पोतराज सांगत होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : वढू बुद्रुक चौकात ट्रॅव्हलच्या धडकेत दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Shirur News : शिरूर तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात ; दुष्काळ जाहिर करण्याची शेतकऱ्यांची मागणी