Shirur News : शिरूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडी महायुतीच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत, असा दावा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केल्यामुळे शिरूर मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. या विजयामुळे शिरूर मतदारसंघात तब्बल तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांनी दारूण पराभव केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. या फुटीनंतर हा मतदारसंघ कुणासाठी अनुकूल असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या मदतीनं या मतदारसंघात कमळ फुलणार, की घड्याळाची टीकटीक सुरूच राहणार, हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सर्वाधिक लोकप्रतिनिधी अजित पवार यांना साथ देत असल्याचे चित्र
शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एक, तर ग्रामीण भागातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघातील ६ पैकी ५ विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाल्यामुळे आता समीकरणे बदलत आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके आमदार आहेत. ते सध्या तटस्थ आहेत. त्यांनी कोणत्याही गटाच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही. (Shirur News) आंबेगाव मतदारसंघातील आमदार दिलीप वळसे पाटील अजित पवारांना साथ देत आहेत. तर खेडचे आमदार दिलीप मोहिते देखील अजित पवार गटासेबत जोडले गेले आहेत. हडपसरचे आमदार चेतन तुपेही अजित पवारांसोबत असल्याचे सांगत आहेत. फक्त शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांसोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत. आता सर्वाधिक लोकप्रतिनिधी अजित पवार यांना साथ देत असल्याचे चित्र आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडी महायुतीच्या पथ्यावर पडणाऱ्या असल्याचा दावा माजी खासदार आढळराव पाटील यांनी केला आहे. तर दुसरीकडे डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांना साथ दिली आहे. (Shirur News) त्यांनी मतदारसंघात काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाले होते. मात्र, आता अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील भाजप सोबत सत्तेत सहभागी झाल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोरील आव्हाने वाढल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने यशस्वीपणे शिरकाव केला होता. (Shirur News) आता बदललेली समीकरणे पाहता भाजपने देखील या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मदतीनं शिरूरमध्ये कमळ फुलणार का, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : रांजणगाव गणपती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये भव्य वृक्षारोपण
Shirur News : चिमुकल्या वैष्णवांचा मेळा दिंडी, अभंग, फुगड्या, विविध खेळातून संस्कृतीचे जतन