शुभम वाकचौरे
Shirur News : जांबूत : रस्त्यात खड्डे आणि खडड्यात पाणी असे दृश्य सध्या शिरूर, आंबेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या पिंपरखेड-देवगाव रस्त्यावर पहावयास मिळत आहे. हा रस्ता अनेक दिवसांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. हा रस्ता दळणवळण, ऊस वाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून मोठमोठे खड्डे पडल्याने, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
प्रवाशांची कसरत
राज्यातील राजकारण्यांनी विकासासाठी सत्ता मिळवली. परंतु रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाला वेळ मिळत नाही. निवडणुकांच्या तोंडावर अनेक नेते येऊन आम्हाला केवळ आश्वासने देतात. परंतु विकासकामांबाबत आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. (Shirur News) गेली अनेक वर्षांपासून आम्ही या रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी करत आहोत. परंतु अद्यापही कोणताच निधी या रस्त्यासाठी मिळालेला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने मुरुमीकरण करून तात्पुरता दिलासा द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे सोसायटीचे संचालक नरेंद्र बोंबे यांनी सांगितले.
या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याकडेही पाठपुरावा केल्याचे माजी सैनिक बळवंत बोंबे यांनी सांगितले. (Shirur News) तत्काळ या रस्त्यावर निधी मंजूर करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रस्ता म्हणजे बिबट प्रवण क्षेत्र
पिंपरखेड-देवगाव हा परिसर बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात आहे. मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य असलेल्या भागातून हा रस्ता जात असून, पिंपरखेड, देवगाव, चांडोह, लाखणगाव या परिसरातून अनेक शालेय विद्यार्थी ये-जा करत आहेत. (Shirur News) रात्रीच्या वेळी अनेक शेतकरी, दूध उत्पादक या रस्त्याने ये-जा करत असून, खड्ड्यांमुळे वाहन चालवणे जिकीरीचे झाले आहे. बिबट्याच्या भीतीपोटी जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. या कामांसाठी जर राजकीय नेते आमच्याकडे दुर्लक्ष करत असतील,. तर येणाऱ्या काळातील निवडणुकांवर आम्ही बहिष्कार घालू, असा इशारा नरेंद्र बोंबे, भाजप नेते रविंद्र बोंबे, संदीप बोंबे, हिरामण बोंबे, दत्तात्रय बोंबे, शुभम बोंबे, मंगेश बोंबे आदींनी दिला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : ‘भिमाशंकर’चा अंतीम भाव ३१०० रुपये प्रतिटन
Shirur News : दैनंदिन जीवनात स्वच्छता ही सवय बनवली पाहिजे – मिट्टूशेठ बाफना