Shirur News : शिरूर, (पुणे) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात व ग्रामीण भागात आवाजाची मर्यादा कोणालाही ओलांडता येणार नाही. त्यातून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, हृदयविकाराचे रुग्ण, यांना त्रास होतो. या पार्श्वभूमीवर, आता आगामी गणेशोत्सव शांततेत व पारंपारिक वाद्यांच्या गजरात आनंदात साजरा करा असे आवाहन शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केले आहे.
यावर्षी पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव
शिरूर तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुका पोलिस पाटलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीजे वर पोलिसांची करडी नजर असेल. त्याबरोबर प्रत्येक गणपती मंडळाला पोलिस ठाण्याची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्या कामी पोलिस पाटिलांनी दक्ष रहावे असेहि जगताप यांनी यावेळी सांगितले.
यापुढे बोलताना जगताप म्हणाले की, लाखो रूपयांचा खर्च करून मोठ्या आवाजाची वाद्ये लावली जातात. आनंदाच्या उत्सावात अनेकांना त्या आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. हॅास्पिटल, शाळा, रहिवासी परीसराचा कोणताच विचार न करता डीजे लावला जातो. आता सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन डीजे मुक्तीचा संकल्प करून नवा आदर्श निर्माण करायला हवा.
या वर्षी पोलिसांची नाकाबंदी असण्याची शक्यता असून त्या दृष्टिने नियोजन केले जाईल. आवाजाची मर्यादा ओलांडणार्या मंडळावर गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यासाठी सर्व मंडळांनी सामाजीक बांधिलकी जपून विधायक उपक्रम राबवावेत. महिला, तरूण, लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून सामाजीक एकोपा घट्ट करावा.
दरम्यान, ढोल ताशा व पारंपारीक वाद्याच्या गजरात गणरायाचे स्वागत करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीसाठी पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव, राजेंद्र गोपाळे, शिवाजी बनकर, शिरूर पोलिसस्टेशन अंतर्गत सर्व पोलिस पाटील उपस्थित होते.