अमोल दरेकर
Shirur News, सणसवाडी : शिरूर तालुका पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. त्या काळात मुलांनी शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून प्रशासकीय सेवेत या तालुक्याची वेगळी ओळख निर्माण केली. तुम्हीही भविष्यातील अधिकारी, व्यावसायिक आहात. त्यासाठी मोठी स्वप्ने पहा. ध्येयवेडे होऊन स्वप्नांचा पाठलाग करा, असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
शिरूर तालुक्यातील नरेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी मुलांशी मुक्त संवाद साधताना आमदार पवार बोलत होते.
या वेळी पुढे बोलताना अशोक पवार म्हणाले की, शालेय शिक्षणाबरोबरच आपण आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींची माहिती आत्मसात केली पाहिजे. सामान्यज्ञान वाढवण्यासाठी परिपाठ, प्रश्न मंजुषा यासारख्या स्पर्धांचे आयोजन करून मुलांचा बौद्धिक विकास करणे ही आजच्या काळाची गरज आहे.(Shirur News ) विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहून तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शिक्षणासाठी केला पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी यशस्वी लोकांच्या चारित्र्याचे वाचन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी लावून घेतली पाहिजे.
पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मुलमंत्र दिला. Success या इंग्रजी शब्दांचा अर्थ सांगत त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात केली. केवळ एखादी गोष्ट केल्याने जीवनात यशस्वी होता येत नाही. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण समाजाच्या हितासाठी करतो का, हे पाहणे म्हणजे आयुष्याचे यश आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग गावापासून देशापर्यंत झाला पाहिजे.
आपल्या परिसरात असणाऱ्या औद्योगिक क्षेत्राचा एक भाग होत, उत्तम उद्योजक होऊन तुम्ही यशस्वी होऊ शकता. (Shirur News) विद्यार्थीदशेत सोशल मीडियापासून लांब राहावे. गरजेपुरताच मोबाईलचा वापर करावा. वाचनालयाचा वापर जास्तीत जास्त करावा. सकस आहार, व्यायाम यासारख्या गोष्टी आत्मसात कराव्यात. यामुळे आपले जीवन सुखकर होईल.
या कार्यक्रमासाठी आमदार अशोक पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, व्याख्याते गणेश शिंदे, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, सरपंच सुवर्णा दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, सदस्य राजेंद्र दरेकर, डॉ. मोहन हरगुडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, शशिकला सातपुते, तनुजा दरेकर, ललिता दरेकर, संतुलनचे बस्तू रेगे, रामदास दरेकर, दगडू दरेकर, नवनाथ दरेकर, अशोक हरगुडे, माजी सरपंच साहेबराव दरेकर, गोरख भुजबळ, प्राचार्य राधिका मेंगवडे, शाळा व्यस्थापन पदाधिकारी यासह मान्यवर व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सणसवाडी ग्रामपंचायत आणि उद्योजक रामदास दरेकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. (Shirur News ) प्रास्ताविक प्राचार्य राधिका मेंगवडे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक काळुराम रणसिंग आणि शिरसाठ यांनी केले.