अक्षय टेमगिरे
शिरूर: शिरूर तालुक्यातील प्रकाश धारिवाल (Shirur News) यांच्या जमिनीच्या कंपाउंड (Pune Crime) शेजारी संतोष मारुती ढोबळे (वय 20, रा. वाडा कॉलनी, शिरूर) याचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1.00 ते सायं. 5.45 दरम्यान ही घटना घडली. संतोष याला त्याचे मित्र सचिन मांमडवाड आणि यश मांदीलकर तसेच त्यांचा एक साथीदार यांनी बोलावून नेले. त्यानंतर कोणत्यातरी अज्ञात कारणावरून त्याच्या डोक्यात व तोंडावर दगड घालून त्याचा खून करण्यात आला.
या घटनेवरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 713/2025 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 103 (1), 3 (5) अंतर्गत दाखल करण्यात आला. गुन्ह्याची गंभीरता आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना माहितीदारामार्फत कळाले की आरोपी सचिन मांमडवाड, यश मांदीलकर आणि त्यांचा एक साथीदार हे साईनगर परिसरात लपून बसले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून संतोष याचा खून केल्याची कबुली दिली.
या गुन्ह्यातील आरोपी सचिन विलास मांमडवाड (वय 24, रा. सिद्धार्थनगर, शिरूर) आणि यश उर्फ श्रेयस महेश मांदीलकर (वय 20, रा. साईनगर, शिरूर) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीची रिमांड मंजूर केली आहे. तर विधीसंघर्षित बालकास बालन्याय मंडळ, येरवडा, पुणे येथे हजर करण्यात आले आहे.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सागर शेळके, राहुल भागवत, हनमंत नकाते, गोविंद खटींग, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, परसराम सांगळे, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार सचिन भोई, विजय शिंदे, नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, अंबादास थोरे, अजय पाटील, रविंद्र काळे, वैभव शेलार, रविंद्र आव्हाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, राजु मोमीन, संजु जाधव आणि सागर धुमाळ यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत करीत आहेत. संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तातडीच्या आणि शिताफीने पार पाडलेल्या कारवाईमुळे शिरूर परिसरातील खून प्रकरणातील आरोपींचा पर्दाफाश झाला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.






