शिरूर : शिरूर तालुक्यातील घोड नदीवर अण्णापूर-म्हसे येथे उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे जवळपास १५ किलोमीटरचा फेरफटका वाचणार असून, सव्वा दहा कोटी रूपये खर्चाच्या या पुलामुळे पुणे व नगर हे दोन जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. बेट भागाचे नंदनवन होत असताना या पुलाला महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे तरूणाईला नोकरीसाठी रांजणगाव औद्योगिक वसाहतीला जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे. या भागातील विद्यार्थी, शेतकरी, प्रवाशांना तसेच रूग्णांना दिलासा देणारा हा मार्ग सुखकर ठरणार असल्याने, नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील कवठे येमाई-फाकटे व म्हसे अण्णापूर या घोडनदीवरील दोन मोठ्या पुलांसह कवठे संविदणे, कवठे-लाखनगाव, माळवाडी-भैरवनाथवाडी, टाकळी हाजी रस्ता, वडनेर येथील नळ पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते.
या वेळी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनिता गावडे, घोडगंगाचे संचालक सोपानराव भाकरे, सुहास थोरात, आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, बाबाजी निचित, कवठे येमाईच्या सरपंच सुनिता पोकळे, म्हसेचे सरपंच सौरभ पवार, वडनेरच्या सरपंच शिल्पा निचित, अण्णापुरचे सरपंच किरण झंजाड उपस्थित होते.
या वेळी वळसे पाटील म्हणाले की, गावची सेवा सोसायटी हा अर्थिक कणा असून, या संस्थेमध्ये काम करणारे संचालक, सचिव हे उच्च शैक्षणिक पात्रता असणारे हवेत. मात्र, ग्रामीण भागात तसे होत नाही. राज्यातील सहकारी सोसायट्या या केवळ पीक कर्ज वाटपासाठी न राहता त्यांना नागरिकांना विविध प्रकारच्या आवश्यक सेवा पुरविता आल्या पाहिजेत. यासाठी नियमात बदल केले जातील.
दरम्यान, कुकडी प्रकल्प अंतर्गत नद्यांवर ६५ बंधाऱ्यांना कुकडी प्रकल्पामधून कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. तसेच राज्यात पाऊस लांबल्याने परिस्थिती गंभीर असून, पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, घोड नदीवरील दोन पुलासह रस्त्यांचे काम झाल्याने या परिसरातील दळणळणाला गती येणार आहे. या वेळी ठिकठिकाणी वळसे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करत, नागरिकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले.