शुभम वाकचौरे
Shirur News : जांबूत : शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संतोषनगर भाम (ता. खेड) येथे झालेल्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते सोनवणे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे
या वेळी माजी मंत्री संजय भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे उपस्थित होते. दीड वर्षापूर्वी तत्कालीन तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी राजीनामा दिल्यानंतर तालुकाध्यक्ष म्हणून आबासाहेब सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. सोनवणे हे खरेदी-विक्री संघावर संचालक म्हणून काम करत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी शिरूर तालुक्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.
दरम्यान, आबासाहेब सोनवणे यांच्या निवडीनंतर निर्वी (ता. शिरूर) ग्रामस्थांनी त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. पक्ष संघटना वाढविणे आणि त्यासाठी कार्यकर्ते सक्षम करून, सामान्य माणसाच्या हितासाठी काम करणे गरजेचे आहे. त्यातून स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत सोनवणे यांनी या वेळी व्यक्त केले.