योगेश मारणे :
न्हावरे, (पुणे) : आलेगाव पागा (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीतील मायंदर मळा येथे अज्ञात तीन सशस्त्र दरोडेखोरांनी बंद असलेली तीन घरे फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ६ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २५) दुपारी ही घटना घडली आहे. दरम्यान या घटनेत दरोडेखोरांना प्रतिकार करताना घरमालकावर पिस्तुलाने गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले आहे.
प्रभाकर गुलाब जांभळकर (वय-६०) असे गंभीर जखमी झालेल्या घरमालकाचे नाव आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान या दरोड्याच्या घटनेत दोन युवक व एका युवतीचा समावेश आहे. याबाबत अलका जांभळकर यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी प्रभाकर गुलाब जांभळकर हे शेतात काम करण्यासाठी गेले होते ते काही वेळाने घराकडे येत असताना घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरोडेखोरांना जांभळकर यांनी प्रतिकार केल्याने त्यांनी पिस्तूलमधून जांभळकर यांच्यावर गोळीबार केला. गोळी जांभळकर यांच्या पोटाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले.त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे मोटारसायकल वरून पसार झाले.
जखमी प्रभाकर जांभळकर यांच्या घरातून २ लाख १८ हजार रूपयांचे सोने तसेच रोख १ लाख रूपये, काळुराम किसन वाघचौरे यांच्या बंद असलेल्या घरातून १लाख ५६ हजार रूपये किमतीचे सोने असा ऐवज चोरला आहे.
माणिक गुलाब जांभळकर यांचे घर फोडून ५८ हजार पाचशे रूपयांचे सोने ऐवज व रोख एक लाख पंचवीस हजार चोरीस गेले आहे. या घटनेत सुमारे सहा लाख ५७ हजार रूपयांचा चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
घटनास्थळी ग्रामीण पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, विभागीय अधिकारी यशवंत गवारी, शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एकनाथ पाटील, संदीप यादव, विक्रम जाधव, तसेच न्हावरे येथील पोलीस गोपीनाथ चव्हाण, शिवाजी बोधे यांनी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. रात्री उशिरा पर्यंत संबंधित गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.