शिरूर: शिरूर नगर परिषद क्षेत्रातील लाखो रुपयांच्या भंगार साहित्याच्या विल्हेवाटीप्रकरणी तसेच पदपथावरील अतिक्रमण, पूररेषेतील अनधिकृत बांधकाम, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आदी प्रलंबित तक्रारींच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा सहआयुक्त (नगर पालिका प्रशासन) व्यंकटेश दुर्वास यांनी नगर परिषदेला दिले आहेत. ही माहिती मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद आणि शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महिबूब सय्यद हे १० जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. भंगार घोटाळा,वीजचोरी, भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणातील आर्थिक गैरव्यवहार,अनधिकृत मोबाईल टॉवर, बेकायदा पार्किंगसारख्या विविध गंभीर मुद्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक पावले उचलल्यामुळे सय्यद यांनी १३ जून रोजी चौथ्या दिवशी उपोषण मागे घेतले.
यावेळी पत्रकार परिषदेत सय्यद आणि बांडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, नगर परिषदेतीलच एका अधिकाऱ्याच्या संगनमताने लाखो रुपयांचे भंगार साहित्य परस्पर विकण्यात आले असून, या प्रकरणातील तक्रारीची दखल घेऊन नगर परिषदेकडून बैठक घेण्याचे व पुरावे तपासून कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान,स्वच्छता निरीक्षक डी. टी. बर्गे यांना १६ जूनपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहितीही यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शहरातील अतिक्रमणबाबत बोलताना अनिल बांडे यांनी सांगितले की, पदपथ व पूररेषेतील अतिक्रमण हटविण्याबाबत नगर परिषद सकारात्मक असून, अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.तसेच पोलिस बंदोबस्तासाठी पत्रव्यवहारही सुरू आहे.
घनकचरा व्यवस्थापनात शास्त्रोक्त पद्धतीचा अभाव व चुकीच्या बिलांची तक्रारही नगर परिषदेकडून ग्राह्य धरली गेली असून, संबंधित ठेकेदारावरील अटी-शर्तींची तपासणी करून दंडात्मक कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय, बेकायदा पार्किंगवर कारवाई, अनधिकृत मोबाईल टॉवर धारकांना नोटीसा, जीओ टॉवरकडून दुप्पट कर आकारणी, मलनिस्सारण प्रकल्प दुरुस्ती, रस्त्यांच्या कामांची चौकशी आदी मुद्यांवर नगर परिषदेने कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
या वेळी शिरूरकर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र सानप, मनसे तालुका संघटक अविनाश घोगरे, शहराध्यक्ष ॲड.आदित्य मैड, शहर संघटक रवीराज लेंडे, अण्णा दौंडकर,राजेंद्र महाजन,रामभाऊ इंगळे,गणेश जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेत मोठा आर्थिक घोटाळा झाला असून, या प्रकरणी नगर परिषदेचे उत्तर समाधानकारक नाही. या प्रकरणी पुरावे सादर करत पाठपुरावा सुरूच राहणार आहे,” असे महिबूब सय्यद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.







