Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील सरपंच गोवर्धन सुरेश टिळेकर यांच्या विरोधात आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर ठपका सरपंचांवर ठेवण्यात आला आहे. अशा अनेक कारणांसाठी त्यांच्याविरोधात नऊ पैकी आठ सदस्यांनी ठराव करुन अपर तहसिलदार तृप्ती कोलते यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा शुक्रवारी (ता.15) होणाऱ्या विशेष सभेकडे लागल्या आहेत. Uruli Kanchan

विशेष बाब म्हणजे, सरपंच गोवर्धन टिळेकर यांनी 20 एप्रिल 2026 रोजी आपल्या पदाचा राजीनामा सभापती, पंचायत समिती हवेली यांच्याकडे सुपूर्द केला होता. सरपंचांनी आपला राजीनामा देताना त्यावर साक्षीदार म्हणून माजी सरपंच सुभाष इंद्रभान लोणकर आणि माजी उपसरपंच सुषमा सुभाषराव टिळेकर यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. Uruli Kanchan
पंचायत समितीने या राजीनाम्याची नोंद घेतली असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे चेंडू टोलवला आहे. मात्र, या राजीनाम्याची सत्यता पडताळणीची प्रक्रिया सुरू असतानाच, आता 8 मे 2026 रोजी 8 सदस्यांनी स्वाक्षरी करून त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला आहे. या अर्जावर माजी सरपंच गणेश निवृत्ती टिळेकर, सुभाष इंद्रभान लोणकर, उपसरपंच सुषमा सुभाषराव टिळेकर, सुशिल अशोक राऊत, वैशाली भानुदास चौरे, नंदा जगन्नाथ राऊत, कल्पना श्रीकांत टिळेकर, व प्रियंका रोहन कांबळे यांच्या सह्या आहेत. Uruli Kanchan
दरम्यान, अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. 15) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास टिळेकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेत अविश्वास ठरावावर मतदान होऊन सरपंचांचे भवितव्य ठरणार आहे. या विशेष सभेसाठी उरुळी कांचन पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. Uruli Kanchan
याबाबत बोलताना टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर म्हणाले, ” जे गैरव्यवहार करुन पदावर बसले त्याच्यावर कारवाई नाही, मी राजीनामा 20 एप्रिललाच दिला आहे., त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध न केल्यास सर्वांवर कायदेशीर कारवाई करणार आहे.”







