शुभम वाकचौरे
जांबूत, (शिरूर) : विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात पुस्तकात कधी कधी वनविभागाने लावलेल्या भित्ती पत्रात बिबट पहायला मिळतो. पण तुम्ही आश्चर्य म्हणाल पिंपरखेड (ता. शिरूर) येथील स्मशानभुमीच्या जवळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळेच्या भिंतीवर, क्रिडागणांवर, शौचालयाच्या ठिकाणी बिबट्याचा मुक्तपणे होणारा वावर शिक्षक, पालक व विद्यार्थी अनुभवू लागले आहेत. त्यामुळे लहान लहान शालेय विद्यार्थ्याची सुरक्षीतता धोक्यात आली आहे. तो येतो… भिंतीवर खेळतो… शौचालयाच्या वरून उठ्या मारतो… असे बिबटच्या मुक्तसंचार वावरा बाबत घडलेला थरार सांगू लागले आहेत.
शिरूर तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पाणी व्यवस्थापनामुळे परीसरात वाढलेले ऊसाच्या क्षेत्रामुळे बिबट्याचे प्रजनन वाढीस लागले आहे. गावाजवळ वाढलेले ऊसाचे क्षेत्र यामुळे बिबट लोकवस्तीकडे अन्नाच्या शोधात येऊ लागले आहेत. बिबटचा मुक्त संचार हा वाढलेला असून पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत.
जांबूत आणि पिंपरखेड परिसरात मागील दोन वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे ४ जणांचा बळी गेला आहे. अनेक नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडत नाही. शनिवारी (ता. १६) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बिबटच्या मुक्तसंचार वावरा बाबत घडलेला थरार मुख्याध्यापक पि. सी बारहाते यांनी सांगितले. सध्या स्कॅालकशिप साठी जादा वर्ग भरविला जातो. त्यातून विद्यार्थी शाळेत लवकर येत असतात. पालकांनी शाळेच्या आवारात बिबटचा मुक्तसंचार पाहिला आहे. त्यामुळे पालकांनी देखील मुलांना शाळेत सोडताना खबरदारी घ्यावी. असे आवाहन मुख्याध्यापक पि. सी बारहाते यांनी केले आहे.
शुक्रवारी (ता. २२) पिंपरखेड- जांबूत रस्त्यावर दोन बिबट्यांचा मुक्तसंचार अनेकांच्या निदर्शनास आला. महिलासह अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पिंपरखेड येथे सकाळी दशक्रिया विधी आटोपून परत येत असताना. रंगनाथस्वामी मंदिराजवळ असलेल्या उसाच्या कडेला महिलांसह अनेक ग्रामस्थांनी रस्त्यावर मुक्तसंचार करणारा बिबट्या पाहिला आहे.
दरम्यान, बिबट पाहिल्यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्याने अनेक दुग्ध व्यावसायिक आणि शालेय विद्यार्थी सकाळच्या वेळी ये-जा करत असतात. मात्र बिबट्यांच्या या मुक्त संचारामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने तातडीने पिंजरे लावावे अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.
याबाबत बोलताना वनसेवक महेद्र दाते म्हणाले की, “पिंपरखेड येथे जिल्हा परीषदेच्या शाळेत भिंतीवर ठसे आढळून आले आहेत. सध्या या भागात एक पिंजरा लावला असून दुसरा पिंजरा लावण्यात येणार आहे. या भागात आम्ही गस्त वाढविल्या आहेत. पाऊस सुरू असल्याने शेतात पाणी साठल्याने बिबटचा वावर मानववस्तीत असून पालकांनी देखील मुलांना शाळेत सोडण्याची खबरदारी घ्यावी.”