शिरूर : मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या वाहनांवर शिरूर पोलिसांनी कारवाई करून ४६ बेशिस्त चालकांवर तब्बल १ लाख १५ हजार रुपयांचा दंड आकाराला आहे.
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण गावामध्ये मोठे आवाजात हॉर्न वाजवणे, सायलेन्सरचा आवाज काढणे व ट्रिपल सीट फिरणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राऊत यांनी वाहतूक शाखेचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले. आणि पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, सदर पथकाने परिक्षा केंद्र कॉफी मुक्त अभियाना अंतर्गत साध्या वेशातील पोलीस यांच्या मदतीने परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला कॉफी पुरवण्याच्या उद्देशाने, विनाकारण फिरणारे व वारंवार चक्रा मारणाऱ्या ४६ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे. आणि त्यांच्यावर १ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
याबाबत बोलताना शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत म्हणाले की, मलठण गावामध्ये व परिक्षा केंद्र परिसरात अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून मोटार सायकल चालवताना, ट्रिपल सीट फिरताना, विना नंबर प्लेट मोटार सायकल व विनाकारण हॉर्न वाजवत असताना मिळून आल्यास, सदरची कारवाई आणखीन कठोर करण्याबाबतचे आदेश वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत.
सदरची कारवाई शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार पवार व पोलीस मित्र बाळासाहेब झिंजुरके यांच्या पथकाने केली आहे.