लोणी काळभोर (पुणे): कृत्रीम आर्थिक संकट निर्माण करुन यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पाडणाऱ्या, खरेदी विक्री संघाची जागा बिल्डरच्या घशात घालणाऱ्या, कारखान्याची २५० एकर जमीन बिल्डरला विकायला निघालेल्या व सहकारी साखर कारखाना खाजगी करायला निघालेल्या विरोधी पॅनेलला तुम्ही मतदान करणार का? असा सवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड यांनी केला आहे. दुसरीकडे मतदारांनी आमचे पॅनल निवडून दिल्यास शेतकरी, कामगार यांची थकित देणी प्राधान्याने देऊन कारखाना सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देखील प्रताप गायकवाड यांनी दिले.
थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ९ मार्च रोजी होत आहे. यानिमित्त अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलची सांगता सभा थेऊर फाटा येथे पार पडली. यावेळी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना प्रताप गायकवाड यांनी वरील आश्वासन दिले.
यावेळी पॅनेल प्रमुख व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी, हिरामण काकडे, कात्रज दुध संघाचे जेष्ठ संचालक गोपाळ म्हस्के, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विकास दांगट, माजी आमदार संभाजी कुंजीर, “यशवंत”चे माजी संचालक पंढरीनाथ पठारे, माणिक गोते, पांडुरंग काळे, बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड, प्रकाश हरपळे, लक्ष्मण केसकर, मिलिंद हरगुडे, पोपट गायकवाड, विकास तुपे, शंकर हरपळे, सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, कुंजीरवाडीचे माजी सरपंच संतोष कुंजीर, शिंदवणे गावचे माजी सरपंच आण्णा महाडिक, सचिन मचाले, सुखदेव कोतवाल, प्रशांत घुले, अशोक कसबे, सचिन सातव, सागर कांचन, मोरेश्वर काळे, तानाजी चौधरी, विकास चौधरी, सचिन तुपे, शामल पवार, भगवान जवळकर, कृषीराज चौधरी, अमोल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रताप गायकवाड म्हणाले, विरोधी पॅनेलमध्ये उमेदवार असणाऱ्या एका भांडवलदाराने मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील अवसायनात निघालेला जय शिवशंकर सहकारी साखर कारखाना विकत घेतला आहे. पुढे त्यांचे सहकारी पार्टनर असणारे देशमुख यांना बाजूला काढून शिवाजी शुगर नावाने खासगी कारखाना सुरु केला. चालू गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांना 2400 रुपये भाव देऊन पुन्हा शंभर रुपये असा पंचवीसशे रुपये बाजार भाव दिला आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवाजी शुगर या कारखान्याला ऊस देणे बंद केले आहे. त्याठिकाणी डबघाईला आलेला शिवाजी शुगर कारखाना विकून आणि त्याच पैशांतून यशवंत खासगी करण्याच्या तयारीत असणारी चांडाळ चौकडी कार्यरत झाली आहे. कारखान्याच्या मालकिची एक इंचही जमीन न विकण्याची वल्गना करत आहेत. मात्र, त्यांची नजर कारखान्याच्या मालकीच्या अडीचशे एकरवर असल्याचा, आरोपही गायकवाड यांनी यावेळी केला.
प्रताप गायकवाड पुढे म्हणाले, “यशवंत” कारखाना तेरा वर्षांपूर्वी नैसर्गिक कारणामुळे बंद पडला नव्हता, तर समोरच्या पॅनेलमधील चौकडीमुळे बंद पाडला होता. याची कारणे या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या घराघरांमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे या चौकडीच्या विरोधात सर्व सभासदांनी निर्धार करून आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून एकहाती सत्ता देऊन यशवंत सुरू करण्याचा संकल्प करावा, असंही गायकवाड म्हणाले.
यावेळी बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले, दोन दिवसांपूर्वी विरोधी पॅनल प्रमुखाने हवेली तालुक्याचे भाग्यविधाते असणाऱ्या अण्णासाहेब मगर यांच्यावर गंभीर आरोप करण्याचा प्रयत्न केला. कृषी उत्पन्न बाजार समिती, यशवंत सहकारी साखर कारखाना व हवेली तालुका खरेदी संघ इत्यादी संस्था अण्णासाहेबांनी उभ्या केल्या. खरेदी विक्री संघाची जागा या पॅनल प्रमुखांनी बिल्डरच्या घशात घातली. त्याचे कारण सांगताना अण्णासाहेब मगर हे खेड लोकसभेला उभे असताना त्यांनी शेतकऱ्यांना जी खत वाटली, त्याचे पैसे खरेदी विक्री संघात जमा झाले नाही, असे म्हटले आहे. ही बाब अंत्यत चुकीची आहे. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी समोरच्या पॅनेल प्रमुखांनी वरील आरोप केला आहे. ज्या माणसाने कारखान्याची चोवीस एकर जमीन विकली व खरेदी विक्री संघाची जागा अल्प किमतीत बिल्डरला विकली. यामध्ये करोडो रुपयांचा घोटाळा केला. मात्र, गुरु शिष्याच्या जोडीसह त्यांच्या सहकाऱ्यांनी या संस्था खाल्ल्या तेही अण्णा साहेबांचे नाव घेऊन. संस्था कर्जबाजारी झाल्याचे कारण देत आहेत म्हणजे हे किती खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत, यावरून सिद्ध होते.
यावेळी पॅनेल प्रमुख या नात्याने बोलताना प्रकाश जगताप म्हणाले, कारखाना सुरू करण्यासंदर्भात आम्ही केंद्र शासन, राज्य शासन, कृषी उत्पन्न बाजार समितीसह तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्वच संस्था आणि राजकीय नेत्यांची मदत घेणार आहोत. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून आम्ही बाजार समितीची निवडणूक लढवली आहे. तसेच राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यासाठी शासकीय मदत मिळवणार आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा, यासाठी 1250 मेट्रीकटन गाळप क्षमतेचा नवीन अध्यायावत इथेनॉल निर्मिती प्रकल्प व व सध्याचा डिशनरी प्रकल्प दुरुस्त करून तो चालवणार आहोत. तसेच हे करत असताना भांडवल उभारणी केल्यानंतर प्रथम शेतकऱ्यांचे थकलेले ऊस बिल व कामगारांची थकीत देणी सर्वप्रथम देण्यास आम्ही बांधील आहोत, असंही प्रशांत काळभोर म्हणाले.