पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल 24 वर्षानंतर पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये जाणार आहेत. आज काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीने देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाकडून सर्व पक्षातील नेत्यांना कॉंग्रेस पक्ष कार्यालयात चहापाणाला आमंत्रित करण्यात आले आहे. शरद पवार यांनी देखील आमंत्रण दिले असून, त्यांनी ते स्वीकारले आहे. आज संध्याकाळी सात वाजता ते पुण्यातील काँग्रेस भवनला भेट देणार आहेत.
पुण्यातील कार्यक्रमात शरद पवार येणार असल्याने या वर्धापन दिनी मुख्य आकर्षण हे शरद पवार असणार आहेत. तसेच देशाच्या विविध भागात या निमित्ताने कार्यक्रम होत आहेत.
काँग्रेस पक्षाची स्वातंत्र्य चळवळीच्या काळात २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईत स्थापना झाली होती. बुधवारी (ता.२८) काँग्रेसचा 138वा स्थापना दिवस आहे.
नवी दिल्लीत राहुल गांधी, सोनिया गांधी हे वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. याठिकाणी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. तर एका कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत येणार आहेत.