पुणे : प्रशासनाच्या एका चुकीमुळे परंडा तालुक्यातील खासापूर गावातील ३०० कुटुंब कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर आले आहे. चार जानेवारीपर्यंत गाव खाली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षात राहायचे कुठे, असा प्रश्न या गावातील नागरिकांना पडला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, १९५८ साली अतिवृष्टीमुळे खासपुरी धरणाचा सांडवा फुटला आणि सांडव्याचे पाणी खासापुरी गावात घुसले. या पाण्याने १०० कुटुंब रस्त्यावर आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गावालगत असणाऱ्या धनाजी देशमुख यांच्या शेतामध्ये या पुरग्रस्त लोकांची राहण्याची व्यवस्था केली.
याचठिकाणी कायमस्वरुपी राहा, असे प्रशासनाने गावकऱ्यांना तोंडी आदेश दिले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी आपली वस्ती देशमुख यांच्या शेतात हलवली. एवढेच नाही तर या ठिकाणी गावकऱ्यांनी पक्की घर देखील बांधली.
तसेच गावच्या सोयीसाठी ग्रामपंचायत, रुग्णालय आणि शाळा देखील उभारण्यात आली. मात्र प्रशासनाने देशमुख यांना या जागेच्या मोबदल्यात ना पैसा दिला ना लेखी आदेश दिले. यामुळे प्रशासनाच्या या कारभाराच्या विरोधात धनंजय देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने देशमुख यांची विनंती मान्य केली आणि येत्या 4 जानेवारीपर्यंत गावकऱ्यांना ही जागा खाली करण्याचे आदेश त्यांनी दिलेआहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे अख्खं गाव आता रस्त्यावर आल्याचे चित्र आहे.