मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अशातच आता ठाण्यातील मुंब्रा भागातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अचानक वीजप्रवाह उतरल्याने, एका 17 वर्षांच्या निष्पाप तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. आलिया असे या मृत तरुणीचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील यास्मीन पार्क परिसरातील B-विंगमध्ये राहणारी आलिया काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. त्यावेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात कुठूनतरी विजेचा करंट उतरला होता. पाण्यातून पुढे जात असताना आलियाचा या प्रवाहाशी संपर्क आला आणि विजेचा जोरदार झटका लागल्याने ती तिथेच बेशुद्ध होऊन कोसळली.

निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी याप्रकरणी टॉरेंट पॉवर लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.स्थानिक नागरिक आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ वाचवण्याचा प्रयत्न केला आणि गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. प्रशासकीय दिरंगाईमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

आलियाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, परिसरातील विजेच्या समस्येबाबत आणि व्होल्टेजमधील चढ-उताराबद्दल 15 जून रोजीच टॉरेंट पॉवरच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, कंपनीने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
पोलिसांनी आलियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून, परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह नेमका कसा आणि कुठून उतरला, याचा पुढील तपास पोलीस आणि वीज विभागाचे अधिकारी करत आहेत.







