पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतन अग्रवालची हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणात आज महत्वाची माहिती समोर येत आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे दुपारी 2.30 नंतर त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले जाणार आहे.पोलीस त्यांची कोठडी वाढवून मागणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने तिची लाय डिटेक्टर (पॉलिग्राम) चाचणी करण्यास संमती दिली आहे, अशी माहिती तिचे वकील ॲड. विपुल दुशिंग यांनी दिली. मात्र, ही चाचणी प्रत्यक्ष करण्यासाठी पोलिसांना आधी न्यायालयाची रीतसर परवानगी घ्यावी लागेल. आज न्यायाधीश ए. एम. विभूते यांच्यासमोर ही सुनावणी होणार असून, दोन्ही बाजूंचे वकील न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्याची शक्यता आहे.

आतापर्यंतच्या 5 दिवसांच्या तपासात पोलिसांच्या हाती आलेले महत्त्वाचे मुद्दे:
गेल्या ५ दिवसांत पोलिसांनी या हत्याकांडाचे गूढ उकलण्यासाठी कसून तपास केला असून, गोळा केलेले सर्व पुरावे आज कोर्टात मांडले जाणार आहेत. तपासादरम्यान समोर आलेले प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
1.हत्याकांडाचा कट आणि सराव: पोलिसांना संशय आहे की, पुण्याच्या लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये हत्येचा कट रचला गेला आणि तिथल्याच एका टेकडीवर त्याचा सरावही करण्यात आला.
2.गुन्ह्याचे रिक्रिएशन आणि डिजिटल पुरावे: सिया आणि चेतनला लोहगडवर नेऊन क्राईम सीनचे रिक्रिएशन करण्यात आले. तसेच चेतनच्या हालचालींचे ‘गेट अनालिसिस’ करण्यात आले. फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने आरोपींच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटाही रिकव्हर करण्यात आला आहे.
3.पूर्वीचे प्रयत्न आणि रेकी: केतनला मारण्याचा यापूर्वी 31 मे, 4 जून आणि 14 जून रोजी प्रयत्न झाला होता का, याचा शोध सुरू आहे. तसेच हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याची किती वेळा रेकी झाली, याची माहिती गोळा केली जात आहे.
4.वस्तू जप्ती आणि नवे साक्षीदार: पोलिसांनी सियाचे कपडे आणि चेतनची पँट जप्त केली आहे. तसेच काही नवीन साक्षीदार समोर आले असून, त्यांच आरोपींसोबत समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. या कटात तिसरा कोणी सामील आहे का, याचाही तपास सुरू आहे.
या सर्व पुराव्यांमुळे आज न्यायालयात नेमके काय घडते आणि तपासातून काय नवीन खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे







