न्हावरे (शिरूर): राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा शिरूर तालुक्यातील पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहत येथे बुधवारी (ता.२३) होणारा नियोजित दौरा काही तांत्रिक अडचणींमुळे रद्द झाल्याची माहिती पदाधिकारी व प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
MEPL म्हणजेच महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कंपनीच्या प्रदूषणामुळे रांजणगाव एमआयडीसी परिसरातील निमगाव भोगी, सरदवाडी, कारेगाव, आण्णापूर आणि रामलिंग या प्रमुख गावांमध्ये पाणी दूषित होऊन काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी नापीक झाल्या आहेत.
याबाबतचा दावा परिसरातील शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी केला होता. तसेच हा मुद्दा अनेक वेळा शासन दरबारी मांडण्यात आला होता. त्याचप्रमाणे माजी आमदार अशोक पवार यांनीही विधानसभेत प्रश्न उपस्थित करून MEPL कंपनीच्या प्रदूषणाबाबत शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच ही बाब संबंधित कंपनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, MEPL कंपनीने शासन, पदाधिकारी, शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांना दाद दिली नव्हती. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याकडे MEPL कंपनीची तक्रार केली होती. त्यामुळे शरद पवार हे संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन येथील परिसरातील शेत जमिनीची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवार (ता.२३) शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे.
शरद पवार यांनी स्वतःहून दौरा रद्द केला असला, तरी पुढे कधीही अचानक शेत जमीन पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा दौरा होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र, उद्या शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि अहिल्यानगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके हे MEPL कंपनीने प्रदूषित झालेल्या परिसराचा बुधवारी(ता.२३) दौरा करणार आहेत.