-बापू मुळीक
सासवड : मी आता माघार घेणार नाही. 2019 ला पक्षश्रेष्ठींनी मला थांबविले, परंतु कोणत्याही परिस्थितीत मी पुरंदर-हवेली विधानसभा लढवणार, अशी घोषणा माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी केली होती. झेंडे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे अशी घोषणा केल्याने पुरंदरच्या राजकारणात व महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली होती.
त्यानंतर संभाजीराव झेंडे यांनी सासवड येथे आमदार रोहीतदादा पवार यांच्या उपस्थितीत युवक मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मी एकमेव उमेदवार असल्याचे घोषित केल्याने व समर्थकांनी भाषणे करून संभाजीराव झेंडे यांना अनुकूल वातावरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु 24 तासातच खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची नसून याबाबत पक्षाची भुमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. तसेच माझ्याकडे या जागेच्या मागणीसाठी कोणीच आलेले नाही. या स्पष्टीकरणाने संभाजीराव झेंडे यांचे पीतळ उघडे पडले आहे. काही पदाधिकाऱ्यांची तशी मागणी असल्याचे माध्यमातून समजल्याचा खुलासाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने संभाजीराव झेंडे यांच्या उमेदवारीबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पक्षश्रेष्ठींना भेटावयास गेल्याचे समजते. आमदार संजय जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत प्रथम उघड भुमिका घेऊन शरद पवार यांचे समर्थन केले तसेच पाठींबा दिला. त्यांच्या भुमिकेचे त्यावेळेस जोरदार स्वागत झाले तसेच पुरंदर हवेलीतून सुप्रिया सुळे यांना भक्कम आघाडी मिळवून देण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता. परंतु संभाजीराव झेंडे यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेने व त्यानंतर आमदार संजय जगताप यांच्या खुलाशाने चांगलाच कलगीतुरा रंगला. संभाजीराव झेंडे यांनी आमदार संजय जगताप यांच्या पक्षनिष्ठेबद्दलच काही प्रश्न निर्माण केल्याचे वृत्त वाहीन्यांनी प्रसिद्ध केल्याने महाविकास आघाडीत चर्चेचा विषय झाला होता.
संभाजीराव झेंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, तसेच ते याच कामासाठी मुंबईला खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने झेंडे यांची मोठी पीछेहाट झाली. पक्षाकडून त्यांना स्पष्ट संकेत देण्यात आल्याचे समजते. झेंडे यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊनच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये माध्यमांशी संवाद साधल्याने त्यांना थेट शरद पवार यांचेच आर्शिवाद मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे झेंडे समर्थकांनी जल्लोष करून विधानसभा निवडणुकीबाबत रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
संभाजीराव झेंडे यांच्याकडे “भगवान का दिया सबकुछ है” त्यामुळे त्यांनी गेली पाच सहा वर्षात मोठी स्वतःची संपर्क मोहीम राबवून निवडणुकीची तयारी केली आहे. परंतु संपुर्ण आयुष्य मुंबई व ठाण्यात सुटा-बुटात व ए.सी. केबीनमध्ये गेल्यामुळे अति वरीष्ठ अधिकारी व नेत्यांशीच त्यांचा संपर्क आला होता. आयुष्यभर नोकरी केलेल्या व्यक्तीने सेवानिवृत्तीनंतर राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याने मतदारांच्या थेट संपर्काचे अनेक प्रश्न त्यांच्या बाबत निर्माण झाले आहेत. या सर्व गोष्टींवर मात करून त्यांनी स्वतःची उमेदवारी मतदारापर्यंत पोहचवली आहे. संपुर्ण मतदार संघाला मोठ मोठे होडींग्ज लाऊन त्यांनी आपली उमेदवार हि प्रतिमा तयार केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने आमदार संजय जगताप यांना मोठा दिलासा मिळाला असून संभाजीराव झेंडे यांना चांगलीच चपराक बसली आहे. तरीदेखील महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वाढली असून संभाजीराव झेंडे यांच्या समर्थकांनी अपक्ष निवडणुक लढवून जिंकण्याचा दावा केला आहे.