पुणे: शुक्रवारी कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंथन शिबिर पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. पण, शरद पवारांकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. आता, शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. “काही लोकांनी टीका-टिप्पणी केली. पण, खूप विचार करण्याची गरज नाही,” असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे.
खासदार शरद पवारांनी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अरूण लाड आणि आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, “कुणी पक्ष सोडून गेलं असेल, तर त्याची चिंता करण्याची गरज नाही. शेवटी जनतेत जे भूमिका मांडून पाठिंबा घेण्यासाठी यशस्वी होतात, जनताही त्यांच्याबरोबर राहते. तेच तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळेल.” “आता महाराष्ट्रात नवीन लोकांना संधी देण्याची वेळ आली आहे. आपण युवकांची संघटना मजबूत करू शकलो, तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एक फळी मोठ्या मतांनी निवडून येईल,” असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
“काही लोकांनी प्रश्न उपस्थित करत टीका-टिप्पणी केली. बाहेर पडलेल्या लोकांनी पक्ष नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, खूप विचार करण्याची गरज नाही. त्यांना जनता प्रश्न विचारेल म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी टीका केली जात आहे. सत्ता येते, जाते. मात्र, जनता तुम्ही कुठून निवडून आला, तुमचं पक्षचिन्ह, तुमचा कार्यक्रम याचा विचार करते. त्यामुळे जागरूक जनता महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत परिवर्तन करण्याची धमक समाजात आहे. आपल्याला परिवर्तनाचा कार्यक्रम घेऊन पुढं जायचं आहे,” असं शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
“तीन-चार महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. पक्षानं ठरवलेला मतदारसंघ निवडून आणण्यासाठी पुढील पावले टाकली पाहिजेत,” असं निर्देश शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिले.