पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी ५ जानेवारीला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बेछुट गोळीबार करण्यात आला. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर यासह अन्य आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर पुणे पोलिसांनी या घटनेतील आठ आरोपींना अटक केली आहे. अशातच शरद मोहळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
स्वाती मोहोळ या पुणे भाजपच्या पदाधिकारी आहेत. यावेळी स्वाती मोहोळ यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेबाबत तुम्हाला भेटून सविस्तर सांगायचे असल्याची भावना व्यक्त केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी हो म्हणत त्यासाठी तुम्हाला वेळ दिली जाईल असं आश्वासन दिलं. तसेच शरद मोहोळ यांच्या खुन्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केल्याची माहिती आहे.
शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. स्वाती मोहोळ यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.