सागर जगदाळे
भिगवण : ऊसतोड कामगारांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी येथील लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
ऊसतोड कामगार हे दरवर्षी आपले गाव, कुटुंब सोडून इतरत्र उदरनिर्वाह करण्यासाठी जात असतात. कारखान्यासाठी ऊसतोड करत असतात. दिवसभर प्रामाणिकपणे काम करून आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी पैसे शिल्लक राहावेत यासाठी काबाडकष्ट करतात. या गोरगरीब लोकांचे कष्ट विचारात घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने येथील बी.एड. महाविद्यालयाने या मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना २० ब्लॅंकेटचे वाटप केले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. या वेळी प्रा. तुषार क्षीरसागर, डॉ. उज्वला लोणकर, अविनाश गायकवाड, अनिता गायकवाड, महेश लांबते, प्रफुल्ल साबळे, विकास आटोळे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.