राजगुरुनगर, (पुणे) : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी घड्याळात कमळ दिसले पाहिजे. त्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटलांना प्रत्येक बूथवर भरघोस मताधिक्य मिळायला हवे. यासाठी कार्यकत्यांनी संयम आणि समन्वय ठेवणे आवश्यक असून व्यक्तिगत भावभावना, गावकी-भावकी बाजूला ठेवून भरघोस मताधिक्य मिळवून दिले पाहिजे, ‘असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी (ता. ३१) खेड तालुक्यातील भाजप नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद बुट्टे पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश विधी आघाडी प्रभारी अॅड. धर्मेंद्र खांडरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राम गावडे, प्रिया पवार, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, चंद्रशेखर शेटे, पाटील गवारी, सुनील देवकर उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, “महायुतीत तीन पक्ष आहेत. या पक्षांचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर पूर्वी कदाचित एकमेकांविरोधात लढले असू शकतात. ते सर्व बाजूला ठेवायचे. संयम ठेवून त्यांच्याशी समन्वय साधायचा. कारण निवडणूक देशाची आहे. भारताला जागतिक महासत्ता करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे, आवश्यक आहेत. त्यांनी पंतप्रधान होणे भाजपला सर्वात जास्त अभिमानास्पद आहे. तसेच देशपातळीवर अजून काही महत्त्वाची कामे करायची राहिली आहेत. त्यासाठी लोकसभेत बहुमत आवश्यक आहे.”
अॅड. धर्मेंद्र खांडरे म्हणाले, “आपल्या बूथवर आपण आपल्या मतदारांना या बुद्धीभेदास बळी न पडू देण्याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी. मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेली भारताची प्रगती जगातील काही देशांना पाहवत नाही. त्यात चीनसारखे भारताचे शत्रूही आहेत. ते आपल्या देशाविरुद्ध षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करीत असतात. विविध माध्यमांतून खोट्या बातम्या पसरवून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात.”