पुणे : सातारा जिल्ह्यातील बुध गावात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तणूक करून तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एक वर्षापासून ते 26 मार्च 2024 या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने सोमवारी 1 एप्रिल रोजी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नराधम बापावर आयपीसी 354(अ) सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी पती–पत्नी आहेत. त्यांना 13 वर्षांची मुलगी आणि 10 वर्षाचा मुलगा आहे. हे सर्व कुटुंब एकत्र राहतात. आरोपी बापने दारु पिऊन मुलांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यासोबत गैरवर्तन केले. पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकणी मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.