वाकड (पिंपरी): लंडनवरून परतत असलेल्या व्यक्तीच्या सामानातून तब्बल 7 लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान घडला. सचिन हरी कामत (वय 44, रा. वाकड. मूळ रा. युनायटेड किंगडम) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामत हे लंडन ते मुंबई व्हाया जेट्टी असे विमानाने आले. लंडन येथून निघताना त्यांनी त्यांच्या सामानाच्या चार बॅग सीलबंद न करता सौदिया एअरलाईन्सकडे दिल्या. त्या चार बॅगमध्ये त्यांनी कपडे, अत्तर, चॉकलेट, इलेक्ट्रिक उपकरणे आणि 152 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने देखील ठेवले होते. कामत हे मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅग परत मिळाल्या नाहीत.
त्यामुळे त्यांनी बॅगांचे आयडी मुंबई विमानतळ येथे जमा केले आहेत. त्यानंतर एका कुरिअर कंपनीद्वारे कामात यांना त्यांच्या बॅग वाकड येथे मिळाल्या. त्यांनी बॅग तपासून पाहिल्या असता सात लाख 60 हजारांचे दागिने आढळून आले नाहीत. त्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केली असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.