लोणी काळभोर: येथील पोलीस ठाणे पुणे ग्रामीण पोलीस दलातून शहर पोलीस दलात आल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल, त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीत आमूलाग्र बदल होईल. गुन्हेगारांवर वचक बसेल. कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारची राहील. अवैध धंदे बंद होतील. थोडक्यात लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामराज्य येईल, अशी अनेक आश्वासने नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमधील लोणी काळभोर पोलीसांचा कारभार पाहिला, तर त्यावेळी मनुष्यबळ कमी असतानाही ग्रामीण पोलीसांचा कारभार आजच्या पेक्षा खरंच चांगला होता, हे खेदाने नमूद करावे लागते.
एका १४ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी तीन दिवसांनंतरही फरार आहे. यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. तोंड ओळख असलेला एक रिक्षाचालक त्याच्या रिक्षामधून पीडित चिमुरडीला तुझ्या आईशी फोनवर बोलणे झाले आहे, असे खोटे सांगत स्वतःच्या घरी घेऊन गेला. तिच्यावर अत्याचार करतो. या घटनेला आता ७२ तास उलटले आहेत. मात्र अद्यापही आरोपी फरार आहे.
६ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास १४ वर्षीय मुलगी शाळेत निघाली होती. त्यावेळी तोंड ओळख असलेला रिक्षाचालक खोटं बोलून तिला घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला. पीडित मुलगी ओरडल्यावर तो पळून गेला आहे. संबंधित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या (पोक्सो) सह विविध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अनेक जणांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. परंतु, तीन दिवसांनंतरही अद्याप पोलिसांच्या हाती ठोस असे काही लागलेले नाही. ही घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. शहर पोलीस दल असूनही तीन दिवसांनंतर देखील आरोपी पकडला जात नसेल, तर कोणाला दोष द्यायचा हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
पुणे जिल्ह्यात तेरा तालुके आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहर लगत असल्याने इतर बारा तालुक्यांच्या तुलनेत हवेली तालुक्यात नागरीकरणाचा वेग प्रचंड प्रमाणात आहे. नागरीकरणाचा वेग वाढल्याने येथील जमिनींचे बाजार भाव सोन्याच्या भावापेक्षा जास्त पटीने वाढले आहेत. परिणामी तालुक्यात सर्वत्र पैशाचा धूर निघत आहे. या पैशातून आलेली तकलादू श्रीमंती तरूणांना विचार करायला वेळच मिळू देत नाही. महागडे मोबाइल, दुचाकी, चारचाकी वाहने, सोन्याचे दागिने, ब्रॅण्डेड कपडे, सेंट, परफ्यूमस, डिओडरंट, शाॅपींग माॅलमध्ये खरेदी, हिंदी, इंग्रजी चित्रपट पाहणे, मित्रांचे वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करणे, केक कापणे, वेगवेगळ्या प्रकारची दाढी वाढवणे, सोशल मिडियात वेगवेगळे फोटो टाकणे, डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणे, व्यसनांचे सर्व प्रकार वारंवार करणे या पलीकडे आजची तरुणाई जातच नाही. हे असे वागणे म्हणजेच जीवन आहे किंवा या शिवाय जीवन असूच शकत नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने तरुणांच्या आयुष्याचे वाटोळे होत आहे. या तरुणाईला वठणीवर आणण्याच्या कामाला पोलीसांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
सध्या लग्नाच्या वरातीत तलवारी हातात घेऊन नाचणे, तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे, कापलेला केक न खाता एकमेकांच्या तोंडाला लावणे, वाढदिवस साजरा करताना अंडी एकमेकांच्या अंगावर फोडणे असे विचित्र प्रकार बहुतेक सर्वच ठिकाणी सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे. पोलीस खात्याचा किंवा अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही; त्यामुळे कोण तलवार घेऊन नाचतोय, तर कोण तलवारीने केक कापतोय. एकंदरीत हवेली तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी एका खंबीर, खमक्या पोलीसांंची गरज आहे. अन्यथा तालुक्यातील बेभान झालेल्या तरुणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे भवितव्य गंभीर आहे.
लोणी काळभोर येथील पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलातून पुणे शहर आयुक्तालयात जाण्यापूर्वी शहर पोलीसांच्या कामाबद्दल बरीच स्वप्ने स्थानिक नागरिकांना दाखवण्यात आली होती. मात्र, तुटपुंज्या मनुष्यबळाअभावी गेल्या दोन वर्षांत यातील एकही स्वप्न पूर्ण होणे दूरच, त्या दृष्टीने वाटचालही झालेली दिसत नाही. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी शहर पोलीसांना अद्याप कामाचा ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेबाबत ग्रामीण व शहर पोलीस असा फरक बिलकूल जाणवत नाही.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पुणे शहराजवळ असलेल्या आणि ग्रामीण कूस बदलून शहरी तोंडवळा लाभलेल्या या गावांमध्ये गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यांतर्गत थेेेऊर व उरुळी देेवाची या दोन ठाण्यांतर्गत पोलीस चौकी आहेत. या दोनही चौक्यांच्या माध्यमातून सदर गावातील कायदा व सुव्यवस्थेचा कारभार हाकला जात आहे. मात्र, तरीही गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून मनुुष्यबळ अपुरे पडत आहे.
हवेली तालुक्याचा पूर्व भाग हा सधन, बागायती शेतीचा व आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. लोणी काळभोर, थेऊर, उरुळी देवाची आदी गावे नागरिकीकरणाकडे जोरदार वाटचाल करीत आहेत. या परिसरात शैक्षणिक संस्था, सदनिका आदींची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. त्यामुळे नागरीक पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच दळणवळणाच्या दृष्टीने सोयीच्या असलेल्या पूर्व हवेलीतील गावांमध्ये राहण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे पुणे शहराजवळ असलेल्या या पूर्व हवेलीतील गावांत नागरिकीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे गेल्या १० – १५ वर्षांत या परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे. शहराशी कनेक्ट असलेल्या या गावांच्या सुरक्षेची मदार संख्येने तुटपुंज्या असलेल्या पोलिसांवर आहे. या गावांत जमिनींच्या व्यवहारातील फसवणूक, गैरव्यवहार, खून, हाणामारी, महिलांवरील अत्याचार, वेगवेगळ्या प्रकारच्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागातही एका कर्तव्यतत्पर अधिकाऱ्याची गरज आहे. धडाकेबाज निर्णय घेणारा आधिकारी वाहतूक शाखेत नियुक्त न केल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये वाढ होत आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी ठीक आहे. परंतु, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक कोंडी खुपच वाईट आहे, असे मत वाहनचालक व्यक्त करत आहेत.
तुटपुंज्या मनुष्यबळासह पोलीस आधिकारी व कर्मचारी आपापले काम सध्या करत आहेत. त्यामुळे सर्वच कर्मचारी वेगळ्या तणावाखाली काम करताना दिसत आहेत. त्यामुळे येथे नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याला अनेक अडचणींना तोंड देत आपल्या कामाचा ठसा उमटवण्याची आवश्यकता आहे.