पुणे : पुणेकर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहे. दिवसभर पुण्यात ऊन सावल्याचा खेळ सुरु आहे. पुणे आणि आसपासच्या भागात तापमानाची नोंद 9 अंश सेल्सिअसपर्यंत करण्यात आली आहे. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद
राज्याच्या उत्तर भागातही तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची घट होईल, असेही हवामान खात्याने सांगितले आहे. पाषाण येथे 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. एनडीए 9.3 अंश सेल्सिअस, शिरूर 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी पाषाण येथे 9.7 अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी शिवाजीनगर येथे 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पिंपरीत धुक्यांची चादर
पिंपरी चिंचवडमध्ये आज दाट धुक्याची चादर पहायला मिळाली होती. या धुक्यांमुळे इमारती अक्षरशः दिसेणाश्या झाल्या होत्या. ढग जमिनीवर अवरतल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पिंपरी चिंचवड शहरवासीयांना यंदाच्या मोसमात गुलाबी थंडीची चाहूल पहिल्यांदाच अनुभवली होती. ग्रामीण भागात ही धुक्यामुळे कमालीची थंडी पसरलेली आहे.