पुणे : अनेक वेळा रेल्वे गाडी पकडण्यासाठी घाई करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. गाडी आणि फलाटाच्या मोकळ्या जागेत प्रवासी पडण्याच्या सतत घटना घडत असतात. याचबरोबर काही जण लोहमार्गावर जाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न देखील करतात.
अशा वेळी प्रसंगावधान दाखवून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रवाशांचा जीव वाचवतात आणि त्यांना नवीन जीवन जगण्याची संधी देतात. असं असताना मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत अशा ४४ जणांचे प्राण वाचविले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांवर रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असते. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचीही काळजी त्यांना घ्यावी लागते.
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जीवनरक्षक या मोहिमेचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत ४४ प्रवाशांचे जणांचा प्राण वाचविला आहेत. त्यात एकट्या मुंबई विभागात २१ घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात १५ घटना, पुणे विभागात ४, तर नागपूर विभागात २ आणि सोलापूर विभागात २ जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.
खूप वेळा प्रवासी निष्काळजीपणा करतात आणि धावत्या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. तसेच गाडीतून उतरताना धोका पत्करतात. अशा प्रवाशांचा जीव वाचविण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना करावं लागत. त्यामुळे प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या वेळेआधी स्थानकावर पोहोचणे गरजेचे आहे. याचबरोबर प्रवाशांनी धावत्या गाडीमधून चढू अथवा उतरू नये आणि जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केलं आहे.