पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी बदनामी होईल, असे वक्तव्य केले होते. या प्रकरणी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल श्री. शिंदे यांच्या न्यायालयात सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. त्याची सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी पुण्यातील न्यायालयात सुनावणी झाली.
बदनामीच्या या खटल्यात पुणे येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे न्यायालयात हजर राहावे, असे समन्स जारी केले होते. पुणे न्यायालयाचे समन्स मिळूनही राहुल गांधी न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत म्हणून राहुल गांधी यांना जामीनपात्र वॉरंट काढावे, असा अर्ज फिर्यादी यांच्या वकिलांकडून न्यायालयात मागील तारखेस दाखल केला होता.
त्यानंतर गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी त्यांच्या वतीने न्यायालयात मागील तारखेस अर्ज दाखल केला होता. राहुल गांधी हे विद्यमान खासदार व लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. देशातील विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर होते. अॅड. पवार यांनी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. राहुल गांधी यांचे वकील यांनी केलेल्या अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश अमोल श्री. शिंदे यांच्या आदेशानुसार पुढील सुनावणी दि. १० जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.