Sassoon Hospital : पुणे : ससून रूग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होत आहे. या प्रकरणात सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालावरुन अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ससूनच्या कॅन्टीनमधून ड्रग्ज विकले जात होते, हो गंभीर बाब आहे. यामध्ये जे दोषी आहेत, त्यांना तत्काळ अटक करा. अन्यथा पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा पवित्रा धंगेकर यांनी घेतला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी करत, या प्रकरणात डीनला वाचवण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे.
राज्य सरकार ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना पाठिशी घालत आहे. २७ ऑक्टोंबर रोजी ससून रुग्णालयासंदर्भातील अहवाल दिला गेला. त्यानंतर तो अद्याप प्रसिद्ध करत नाही. याचाच अर्थ डीनला वाचवण्याचे काम राज्य सरकार करत आहे. ललित पाटीलकडून करोडो रुपये घेऊन ठाकूर यांनी त्याला रूग्णालयात तब्बल नऊ महिने पंचातारांकीत सुविधा दिली, हे वास्तव आहे. या प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल देखील आला आहे. मात्र, अद्याप एकाही पोलिसावर कारवाई झालेली नाही. पाटीलने पैसे चारून अनेकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळेच त्याच्या सर्व काळ्या धंद्यांना अभय मिळाले. आता हे प्रकरण शांत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण मांडणार आहे, असेही धंगेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित पोलीस आणि ससून रुग्णालयाचे दोषी आधिकारी यांना अटक करा आणि समितीचा अहवाल प्रसिद्ध करा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. सरकारकडून या प्रकरणात कारवाई झाली नाही, तर आपण उच्च न्यायालयात जाऊ, असा थेट इशाराही आमदार धंगेकर यांनी दिला आहे. ललित पाटील फरार झाल्याप्रकरणी तपासाला गती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तपास सुरू आहे, असे त्यांनी म्हटल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केले.