पुणे : राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाउस कोसळत असून पुण्यातही रात्रभर पावसाने कहर केला. मागील वेळी घाटक्षेत्रातील अतिमुसळधार पावसाचा इशारा शहराला देण्यात आल्याने शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.मात्र, तेव्हा पुण्यात पावसाने सुट्टी दिली होती. त्यानंतर हवामान विभागाने दुपारी तो इशारा घाटमाथ्यासाठी होता असे स्पष्टीकरण दिले होते. परंतू आज रात्रभर पुण्यात पावसाची संततधार असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कालपासून पुण्यात पाऊस सुरु आहे. पावसाने रात्रीपासून जोर धरला असून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. शहरातही धोधो सुरु आहे. यामुळे पुणे शहरासह भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरातील शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवून पहाटे ०५•३० वाजता ३५ हजार ५७४ क्यूसेक करण्यात येत आहे. तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
– कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग