पुणे : सर्वत्र एकच चाहूल लागली आहे ती म्हणजे वारीची. पुण्यात तुकाराम महाराजांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. याच दरम्यान, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या विशेष प्रयत्नांनंतर संत तुकाराम महाराज संस्थानने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खडकी, औंध, बोपोडी, बाणेर आणि रेंजहिल्स परिसरातील भाविकांना पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

सुनीता वाडेकर यांच्या विनंतीला मान देऊन संत तुकाराम महाराज संस्थानने पुणे शहराच्या प्रवेशद्वारावरील बोपोडी येथे यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या विसाव्यासाठी २५ मिनिटे एवढी वेळ केली आहे.

पुण्यात मुक्काम करणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ यापूर्वी खूप कमी होती. अशास्थितीत भाविकांना दर्शन घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. भाविकांची अडचण लक्षात घेत सुनीता वाडेकर यांनी विसाव्याची वेळ वाढविण्याची विनंती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्याकडे केली. त्यांच्या विंनंतीवरून २५ मिनिटांपर्यंत वेळ वाढवण्याचा निर्णय संत तुकाराम महाराज संस्थानने दिला आहे.








