लोणी काळभोर, (पुणे) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरुन लाखो वारकरी देहू ते पंढरपूरला पायी वारी करतात. मात्र, पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील पुर्वीच्या अडचणी जैसे थे असल्याने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापुर्वी या अडचणी सुटणार का? की याही वर्षी प्रवास खडतरच होणार असा प्रश्न लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांना पडला आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 339 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवारी (ता. 28) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला ठिकठिकाणी वाढती अतिक्रमणे, साईडपट्ट्या उखडलेल्या असून, बेशिस्त पार्किंगमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे यावर्षीही संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची वाट बिकटच ठरणार आहे.
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर मुक्कामी यायला महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. बुधवारी (ता. 02 जुलै) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर येथे येत आहे. टोलवसुलीच्या काळात महामार्गाची दुरूस्ती, देखभाल होत होती. त्यानंतरच्या काळात मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वारक-यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला पालखी मार्गावरील झाडे काढणे, तळावरील झाडे झुडपे काढून मैदान स्वच्छ करणे, सपाटीकरण करणे, विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा, आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गात कोणत्याही अडीअडचणींचा सामना वारकऱ्यांना करावा लागू नये अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अजुनही या मार्गावर काम हाती घेण्यात आले नाही किंवा साधी डागडुजीहि दिसून येत नाही.
महामार्गाच्या दुतर्फा साचतेय पावसाचे पाणी..
पुणे – सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, सोरतापवाडी, उरुळी कांचन व परिसरात महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. महामार्गावरून पुणे – सोलापूर, व आसपासच्या पंचक्रोशीतील अनेक शेतकरी, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांची सतत ये जा असते. दुचाकीस्वारांना रस्त्यावरील डबक्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. पायी चालणारी व्यक्ती पाण्यातून जाण्याचे टाळत असल्याने तो रस्त्याच्या मधोमध चालतो, पर्यायाने मागून येणा-या वाहनाला तो पुढे जाण्याचा मार्ग देत नाही, अशा वेळी वाहनांच्या रांगा लागत आहेत.
पुणे – सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी मोठ्या प्रमाणावर साचत आहे. पाणी जाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने पाणी साचून राहत आहे. तसेच रस्त्यावर माती, वाळू व कचरा साचल्याने वारकऱ्यांना या चिखलातून प्रवास करावा लागणार आहे. तसेच पालखी मार्गावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
– बापू दळवी, नागरिक, लोणी काळभोर, ता. हवेली)मान्सूनपूर्व गटारलाईनची सर्व कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. तसेच महामार्गावर पाणी साचत असेल त्या ठिकाणी पहिलाच पाऊस असल्याने चेंबरच्या ठिकाणी माती साचली आहे. यासाठी रस्त्यावरील काम सुरु आहे. पालखी अगोदर संपूर्ण रस्ता वापरण्यासाठी चांगला ठेवण्यात येणार आहे.
– रोहन जगताप, प्रकल्प अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे